कर्करोगाने ग्रस्त असलेल्या एका आजींचा राहत्या घरी मृत्यू होतो..नेहमी घरी येऊन तपासून जाणारे आणि आजींच्या प्रकृतीची कल्पना असणारे डॉक्टर मृत्यूचे वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यास मात्र नकार देतात..मृत्यूचे कारण स्पष्ट करणारे वैद्यकीय प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय मृत्यूचे प्रमाणपत्रही मिळत नसल्यामुळे आजींच्या कुटुंबीयांची या डॉक्टरांकडून त्या डॉक्टरांकडे वणवण सुरू होते..अखेर अडीच- तीन तासांच्या पायपिटीनंतर ओळखीचे एक डॉक्टर आजींना तपासून प्रमाणपत्र द्यायला तयार होतात. एका त्रस्त नागरिकाने व्यक्त केलेला हा अनुभव.
रुग्णाचा मृत्यू नैसर्गिक कारणामुळेच पण घरी झाल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आधीच दु:खात असलेल्या नातेवाइकांना आणखी कटकटींना सामोरे जावे लागत आहे. वैद्यकीय व्यावसायिक मृतदेहाला स्वत: तपासून, मृत्यूच्या कारणाबद्दल कोणतीही शंका उत्पन्न न झाल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र देऊ शकतात. परंतु रुग्णाच्या मृत्यूनंतर काही कायदेशीर प्रकरण उद्भवल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्यामुळे त्यात गोवले जाण्याची धास्ती काही डॉक्टरांच्या मनात असल्याचे दिसून येत आहे.
जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुनील पायगुडे म्हणाले, ‘‘रुग्ण आणि डॉक्टर यांच्यात आवश्यक असणारे विश्वासाचे नाते आता उरलेले नाही. डॉक्टरांनी दिलेल्या मृत्यूच्या प्रमाणपत्राचा नंतर कायदेशीर प्रकरणांमध्ये समावेश होऊ शकत असल्यामुळे प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी घेण्यास डॉक्टर कमी पडतात. अशा वेळी रुग्णाचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले गेले तरी रुग्णाच्या नातेवाइकांना त्याचे शवविच्छेदन करून घेण्यास सांगितले जाते.’’
रुग्णाच्या आजाराशी नेहमीचा परिचय असल्यास मृत्यूचे वैद्यकीय प्रमाणपत्र देणे शक्य असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. माया तुळपुळे यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, ‘‘डॉक्टरांनी रुग्णाला जिवंत पाहिलेच नसेल किंवा मृत्यू संशयास्पद असेल तर वैद्यकीय प्रमाणपत्र देणे चुकीचे आहे. मृत व्यक्ती लहान मूल किंवा गर्भवती स्त्री असेल तरी प्रमाणपत्र देताना हा विचार केला जातो.’’

Story img Loader