एका आजोबांचा घरी झोपेतच मृत्यू होतो. मृत्यू झाल्याचे लक्षात येताच घरची मंडळी मृत्यूचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांच्या नेहमीच्या डॉक्टरांकडे धाव घेतात. हे डॉक्टर आजोबांना नेहमी तपासत असूनही त्यांच्या मृत्यूचे प्रमाणपत्र द्यायला नकार देतात. हवालदिल झालेले घरचे लोक त्या डॉक्टरांना मृत्यूचे प्रमाणपत्र मिळण्याचा काही पर्याय आहे का ते विचारतात. डॉक्टर सुचवतात की आजोबांचा मृतदेह रुग्णालयात घेऊन आल्यास त्याच्या तपासण्या करून मृत्यूचे प्रमाणपत्र देता येईल. मग सुरू होते मृतदेह रुग्णालयात नेण्यासाठी धावपळ. रुग्णवाहिका बोलावून आजोबांचा मृतदेह डॉक्टरांनी सुचवलेल्या रुग्णालयात नेला जातो, त्याच्या तपासण्या केल्या जातात आणि अखेर वृद्धत्वामुळे मृत्यू झाल्याचे प्रमाणपत्र मिळते. पण हा सगळा खटाटोप करण्यात आजोबांच्या नातेवाईकांचे काही तास खर्ची पडलेले असतात आणि त्यांना पुरेसा मनस्तापही झालेला असतो..
पुण्यात काहीच दिवसांपूर्वी घडलेला हा प्रसंग. पण हा केवळ ‘त्या’ एकाच आजोबांच्या नातेवाईकांचा अनुभव नाही. वृद्धत्वामुळे अधिकाधिक काळ घरीच असणारे, एकाच फॅमिली डॉक्टरांकडून तपासून घेणारे आजी-आजोबा, दीर्घ काळ एखाद्या असाध्य आजाराने ग्रस्त असणारे आणि रुग्णालयात राहण्याऐवजी घरीच राहून उपचार घेणारे रुग्ण अशा अनेकांचा हा प्रश्न आहे. अशा व्यक्तींचा घरी मृत्यू झाला तरी त्यांच्या मृत्यूचे प्रमाणपत्र मिळवणे नातेवाईकांसाठी सोपे नाही. अशा वेळी डॉक्टरांकडून त्याच्या मृत्यूचे प्रमाणपत्र देण्यास नकार मिळाला तर?. वैद्यकीय क्षेत्रातील काही जाणकारांची यासंबंधीची मते ‘लोकसत्ता’ ने जाणून घेतली.

‘‘रुग्ण जर एकाच डॉक्टरांकडे नेहमी जात असेल आणि रुग्णाच्या आजाराचा संपूर्ण इतिहास डॉक्टरला माहीत असेल तर त्या रुग्णाच्या मृत्यूचे प्रमाणपत्र देण्यास डॉक्टर नकार देऊ शकत नाहीत. अशा प्रसंगी डॉक्टरने नकार दिल्यास रुग्णाचे नातेवाईक संबंधित डॉक्टरविरुद्ध महाराष्ट्र वैद्यक परिषदेकडे तक्रार नोंदवू शकतात. डॉक्टरने अनोळखी असणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र मात्र देणे अपेक्षित नाही, कारण त्यात पुढे अनेक न्यायवैद्यकीय मुद्दे उपस्थित होऊ शकतात. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे मृत्यूचे प्रमाणपत्र देताना डॉक्टरने कोणतेही शुल्क घेणे महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या कायद्याला धरून नाही. मृत्यूचे प्रमाणपत्र नि:शुल्कच दिले गेले पाहिजे.’’
डॉ. अरुण हळबे (अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए), पुणे)
—–

‘‘मृत्यूचे प्रमाणपत्र मिळण्याबाबत ‘एमएमसी’कडे तक्रार आल्यानंतर त्यात किती तथ्य आहे ते तपासून संबधितांवर कारवाई करण्याचे अधिकार ‘एमएमसी’ला आहेत. मात्र प्रत्येक घटनेची परिस्थिती वेगळी असल्यामुळे अशा प्रकरणांमध्ये सरसकट एकच नियम लावता येत नाही. आमच्याकडे येणाऱ्या ९० टक्के तक्रारी रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील संवाद संपल्यामुळे केल्या जात असल्याचे निदर्शनास येते. प्रिय व्यक्तीचे निधन झाल्यानंतर नातेवाईक वेगळ्या मानसिक स्थितीत असतात. त्यामुळे काही वेळा भावनातिरेकामुळे घटनेचा वेगळा अर्थ लावूनही डॉक्टरविरुद्ध तक्रार केली जाण्याची शक्यता असते. नातेवाईक धक्क्य़ातून सावरल्यानंतर त्यांना समजावून सांगितले गेले तर त्यांना ते पटतेही.’’
डॉ. किशोर टावरी (अध्यक्ष, महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिल)
—–
‘‘रुग्णाची आणि त्याच्या आजाराची कोणतीही माहिती नसताना मृत्यूचे प्रमाणपत्र देण्यात धोका आहे. केवळ रुग्णाचे कुटुंब डॉक्टरला माहीत असणे पुरेसे नाही. अशा परिस्थितीत डॉक्टर प्रमाणपत्र देणे नाकारतात. रुग्णाचा मृत्यू नैसर्गिक असल्याबद्दल डॉक्टरांची खात्री हवी आणि त्याचा आजार डॉक्टरला माहिती हवा. मृत व्यक्ती डॉक्टरांकडेच नियमित उपचार घेत असली तर डॉक्टर प्रमाणपत्र देतात.’’
डॉ. अनंत फडके (जन आरोग्य अभियान)
—–
‘‘वयाची साठ वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीचा वृद्धापकाळाने नैसर्गिक मृत्यू झाल्यास स्थानिक नगरसेवकांच्या मार्फत त्याच्या मृत्यूचे प्रमाणपत्र मिळवून देण्याची सोय उपलब्ध आहे. मात्र डॉक्टर मृत व्यक्तीला ओळखत नसल्यास मृत्यूचे प्रमाणपत्र देणे डॉक्टरांसाठीच घातक ठरू शकते. मृत व्यक्तीच्या संदर्भात एखादे न्यायप्रवीष्ठ प्रकरण उभे राहिल्यास रुग्णाच्या मृत्यूचे नेमके कारण आणि त्याचा पुरावा डॉक्टरांना सादर करावा लागू शकतो. या गोष्टी सादर करण्यास डॉक्टर असमर्थ ठरल्यास तो अजामीनपात्र गुन्हा ठरतो. मृत्यूचे कारण स्पष्ट असेल तर डॉक्टर मृत्यूचे प्रमाणपत्र देतात. पूर्णत: अनोळखी व्यक्तीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी शवविच्छेदन हाच एक पर्याय आहे.’’
डॉ. संताजी कदम (माजी अध्यक्ष, जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (जीपीए), पुणे)

तुम्हाला काय वाटते?
तुम्हालाही ‘त्या’ आजोबांच्या नातेवाईकांसारखाच अनुभव आला आहे का? तुमच्या जवळच्या व्यक्तीचा घरीच मृत्यू झाल्यानंतर नेहमीच्या डॉक्टरांनी मृत्यूचे प्रमाणपत्र देणे नाकारले आहे का? आपल्याला आलेला अनुभव किंवा याबाबतचे आपले मत  loksatta.pune@expressindia.com ई- मेलवर कळवा. या विषयावर अधिक जनजागृती होण्याच्या उद्देशाने यातील निवडक अनुभव / मते प्रसिद्ध केले जातील.

Story img Loader