चेंबरमधील मैलापाणी शुद्धीकरणाचे काम करीत असताना विषारी वायूमुळे गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू झाला. तर दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काळेवाडी-वाकड मार्गावर जगताप डेअरी परिसरातील ‘पार्क इस्टेट’ येथे शनिवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली.
गणेश शेलार (वय ३०) आणि प्रवीण जमदाडे (वय २८) अशी मयतांची नावे आहेत. तर, कपिल कंद (वय ३०) व हनुमंत होले हे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्क इस्टेट गृहप्रकल्पात तुंबलेल्या ड्रेनेजच्या सफाईचे काम करण्यासाठी ठेकेदाराला बोलावून घेण्यात आले. हे काम करण्यासाठी ठेकेदाराने तीन कर्मचाऱ्यांना सांगितले. सकाळी अकराच्या सुमारास ते काम करत असताना, त्यातील गणेश चेंबरच्या आत उतरला, थोडय़ाच वेळात त्यास श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. चक्कर येऊ लागल्याने तो पडला. तेव्हा प्रवीणने गणेशला चेंबरमधून वर काढण्याचा प्रयत्न केला. त्याला ते जमले नाही. त्यामुळे तोही चेंबरमध्ये उतरला व घसरून पडला. त्यालाही तसाच त्रास होऊ लागला. मदतीला धावणाऱ्या तिसऱ्या कर्मचाऱ्यालाही तसाच अनुभव आला, त्याने घाईने इतरांना बोलावले. अग्निशामक दलालाही कळवण्यात आले. अग्निशामकचे पथक येताच त्यांनी सुरक्षा साधनांचा वापर करून त्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. यामध्ये  अग्निशामक दलाच्या एका जवानालाही त्रास झाला आहे. थेरगाव येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात त्यांना उपचारासाठी नेण्यात आले. तेव्हा गणेश व प्रवीण मृत झाल्याचे घोषित करण्यात आले. अन्य दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. वाकड पोलीस पुढील तपास करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा