पुणे : राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील खासगी रुग्णालयात ६२ वर्षीय रुग्णाचा मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या सहा झाली आहे. दरम्यान, राज्यातील जीबीएसची रुग्णसंख्या १७३ वर पोहोचली आहे.

पुण्यातील काशीबाई नवले रुग्णालयात ६३ वर्षीय पुरुषाचा जीबीएसने बुधवारी सायंकाळी मृत्यू झाला. ते कर्वेनगरमधील रहिवासी आहेत. त्यांना २८ जानेवारीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना ताप, जुलाब आणि अशक्तपणाचा त्रास होता. त्यांना आयव्हीआयजी इंजेक्शन देण्यात येत होते. बुधवारी अस्वस्थ वाटू लागले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आतापर्यंत जीबीएसमुळे सहा जणांचा मृत्यू झाला आहे. जीबीएसच्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू सोलापूरमध्ये झाला. हा रुग्ण पुण्यातून सोलापूरला गेला होता. त्यानंतर पुण्यात ४ आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

राज्यात जीबीएसचे आतापर्यंत १७३ रुग्ण आढळून आले असून, त्यातील १४० रुग्णांचे जीबीएस निदान झाले आहे. पुण्यातील जीबीएस रुग्णसंख्येतील वाढ सुरूच असून, पुणे महापालिका ३४, महापालिकेत नव्याने समाविष्ट गावे ८७, पिंपरी-चिंचवड महापालिका २२, पुणे ग्रामीण २२ अशी रुग्णसंख्या आहे. राज्यात इतर जिल्ह्यांत आतापर्यंत ८ रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी ७२ जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याचबरोबर २१ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. राज्यभरात ७२ रुग्णांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

वयनिहाय जीबीएस रुग्णसंख्या

वयोगट – रुग्ण

० ते ९ – २३

१० ते १९ – २३

२० ते २९ – ३८

३० ते ३९ – २१

४० ते ४९ – २२

५० ते ५९ – २५

६० ते ६९ – १५

७० ते ७९ – २

८० ते ८९ – ४

एकूण – १७३

Story img Loader