गेल्या दोन महिन्यांपासून येरवडा मधील एसओएस बालग्राम आश्रमात राहणाऱ्या नेवासे येथील सात वर्षांच्या बालिकेचा शुक्रवारी सकाळी संशयास्पद मृत्यू झाला. या बालिकेच्या आईचा एक वर्षांपूर्वी मृत्यू झाला असून त्याप्रकरणी तिच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा खटला न्यायालयात सुरू असून त्यात ही बालिका साक्षीदार होती.
कल्याणी गीते (वय ७, रा. नेवासे) असे मृत्यू झालेल्या बालिकेचे नाव आहे. कल्याणीला शाळेत उलटी होऊ लागल्यामुळे गुरुवारी दुपारीच ती बालग्राम आश्रमात आली. तिच्यावर उपचार केल्यानंतर ती संध्याकाळी झोपली. शुक्रवारी सकाळी पुन्हा पोटात दुखू लागल्याचे सांगत उठली. त्यावेळी तिने हात-पाय दुखत असल्याचे सांगितले. त्यामुळे तिला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला, अशी माहिती बालग्रामचे संचालक अमरज्योती शर्मा यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणीच्या आईचा काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाला. त्यासंदर्भात तिच्या वडिलांवर नगरमधील पाथर्डी पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल आहे. तिच्या आईची आत्महत्या नसून तिचा खून झाला असल्याचा आरोप करत तिच्या नातेवाइकांनी उच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे. या घटनेत कल्याणी साक्षीदार आहे. बाल कल्याण समितीने कल्याणीला तिच्या वडिलांकडून धोका असल्याचे सांगत तिला पुण्यात बालग्राम येथे ठेवले होते. गेल्या दोन महिन्यांपासून ती पुण्यात राहायला होती. या प्रकरणात तिचा जबाब अहमदनगर मधील पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस नोंदविण्यासाठी येणार होते. त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कल्याणीच्या आईच्या नातेवाईकांनी संस्थेकडून कल्याणीच्या मृत्यूविषयी काहीही माहिती दिली नसल्याचे सांगितले. काही दिवसांपूर्वी तिचे वडील संस्थेच्या काही जणांस भेटून गेल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Story img Loader