अंबरनाथमध्ये रेल्वे अपघातात जखमी झालेल्या दिव्या जाधव या तरुणीचा मंगळवारी मृत्यू झाला. १२ जानेवारी रोजी संध्याकाळी दिव्या ही सौंदर्य प्रसाधनगृह शिकवणीला जात असताना अंबरनाथ-उल्हासनगर दरम्यान लोकलमधून पडून ती गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर तिला अंबरनाथ रेल्वे स्थानकात आणण्यात आले होते. मात्र रुग्णवाहिका वेळेत न आल्यामुळे आणि रेल्वे प्रशासनाकडून वैद्यकीय अहवाल वेळेत न दिल्यामुळे दिव्या बराच वेळ उपचारांअभावी फलाटावर पडून होती, असा आरोप कुटुंबीयांनी केला होता. त्यानंतर दिव्याला आधी उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात आणि तिथून पुढे पुन्हा एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले होते.
उपचारांचा खर्च कुटुंबीयांच्या आवाक्याबाहेरचा असल्यामुळे तिला मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले होते. तिथे १० दिवसांपासून उपचार सुरू होते. अखेर मंगळवारी सकाळच्या सुमारास तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांनी रेल्वे प्रशासनावर आरोप केले आहेत. अपघातात जखमी झालेली आमची मुलगी तब्बल ४५ मिनिटे रेल्वेच्या फलाटावर पडून होती. तिला योग्य वेळेत उपचार दिले असते, तर आमची मुलगी नक्की वाचली असती, असा दावा दिव्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.
हेही वाचा – ठाणे : भिवंडीत तीन वर्षांच्या मुलीची हत्या, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू
मात्र दिव्याच्या उपचारात कोणतीही दिरंगाई झालेली नसल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि रेल्वे कर्मचारी अपघाताच्या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी लोकलने जखमी अवस्थेतील दिव्याला अंबरनाथ रेल्वे स्थानकात आणले. ४ वाजून ३५ मिनिटांनी फलाटात आलेली दिव्या पाचच्या सुमारास रुग्णालयाकडे रवाना झाली होती, असेही रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. मात्र दिव्याच्या कुटुंबीयांनी रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.