लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: जांभूळवाडी तलावामध्ये सोडण्यात येत असलेल्या सांडपाण्यामुळेच शेकडो माशांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तलावामध्ये सांडपाणी येत असल्याने तलावालगतच्या बांधकामांना नोटीस दिली असून, अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची सूचना बांधकाम विभागाला करण्यात आली आहे.
जांभूळवाडी तलावातील शेकडो मासे मृत्युमुखी पडल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून गेल्या तीन दिवसांपासून तलाव परिसराच्या स्वच्छतेचे काम सुरू आहे. त्या वेळी तलावात थेट येणाऱ्या सांडपाण्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचे दिसून येत असल्याची माहिती उपायुक्त माधव जगताप यांनी दिली.
हेही वाचा… पुणे महापालिकेच्या सेवेत आता तृतीयपंथी!
तलावात सांडपाणी येत असल्याने तलावागतच्या बांधकामांना नोटीस बजाविण्यात आली आहे. या बांधकामांचे पाणी बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून लगतची अनधिकृत बांधकामे काढण्यासंदर्भात बांधकाम विभागाला सूचना देण्यात आली आहे. तलावातील दूषित पाणी तपासणीबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून तपासणी करण्यात येणार आहे. त्याबाबतचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर पाणी स्वच्छतेची कार्यवाही केली जाणार आहे. धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या महापालिका सहायक आयुक्त सुरेखा भणगे आणि परिमंडळ तीनचे उपायुक्त जयंत भोसेकर यांच्या मार्फत ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.