आजारी असल्याने शाळेत न जाता घरी राहिलेली चिखली येथील १६ वर्षांची युवती पाचव्या मजल्यावरून खाली पडल्याने मृत्युमुखी पडली. पिंपरी महापालिकेच्या चिखलीतील ‘घरकुल’ प्रकल्पातील इमारतीत बुधवारी सकाळी ही घटना घडली.
निकिता चंद्रकांत निर्सगध (वय १६, रा. घरकुल, चिखली) असे तिचे नाव असून येथील जी. के. चावला शाळेत इयत्ता नववीच्या वर्गात ती शिकत होती. आजारी असल्याने शाळेत जाऊ नको, असे आई-वडिलांनी तिला सांगितले होते म्हणून निकिता घरीच होती. सकाळी अकराच्या सुमारास ती गच्चीत आली व तेथून खाली पडली. तिला तातडीने यशवंतराव चव्हाण रूग्णालयात नेण्यात आले. तथापि, तिचे उपचारापूर्वीच निधन झाले. घटनास्थळी पोलिस आले. त्यांनी आई-वडील तसेच आजूबाजूच्या नागरिकांकडे चौकशी केली. तेव्हा ती पाय घसरून पडल्याचे रहिवाशांनी सांगितले. त्यानुसार, पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. यासंदर्भात, पोलीस निरीक्षक संजय नाईक पाटील यांनी पत्रकारांना सांगितले, की निकिताच्या आई-वडिलांनी ती पाय घसरून पडल्याचा जबाब दिला आहे. सकाळी ती न्हाणीघरात घसरून पडली होती. आजारी असल्याने शाळेत व अन्य कुठेही जाऊ नको, असे तिला सांगितले होते. घरी एकटीच असताना गच्चीतून तोल जाऊन ती खाली पडली. पुढील तपास सहायक फौजदार साळुंके करत आहेत.

Story img Loader