सव्वा वर्षानंतर दोन डॉक्टरांसह परिचारिकेवर खडकी पोलिसात गुन्हा
डॉक्टरच्या चुकीच्या उपचारामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सव्वा वर्षाने दोन डॉक्टर आणि एका परिचारिकेवर खडकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.डॉ. खालीद सय्यद (वय ५० रा. बोपोडी) याच्यासह आणखी एक महिला डॉक्टर आणि परिचारिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतुल तुपसौंदर्य (वय २६, रा. खडकी बाजार) याच्या मृत्यू प्रकरणी पत्नी कविता यांनी फिर्याद दिली आहे. फिर्याद नोंदविण्यासाठी ऍड. योगेश आहेर आणि ऍड. अमोल रायकर यांनी मदत केली. ही घटना सप्टेंबर २०२१ मध्ये घडली होती.
हेही वाचा >>>अश्विनी जगताप, शंकर जगताप समर्थकांकडून इमेज वॉर!; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
अंगात कणकण आल्याने अतुल २० सप्टेंबर रोजी सायंकाळी डॉ. सय्यद यांच्या रुग्णालयात उपचारासाठी गेला. त्यावेळी डॉक्टरांच्या सूचनेनुसार परिचारिकेने कमेरेवर उजव्या बाजूला इंजेक्शन दिले. त्या जागी इंफेक्शन होऊन गाठ झाली. त्यानंतर ससून रुग्णालय येथे २४ सप्टेंबर रोजी अतुलचा मृत्यू झाला होता. ससून रुग्णालयाच्या अधिष्ठाताच्या अध्यक्षतेखाली नेमेलेल्या समितीच्या अहवालनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैद्यकीय चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला. त्यानंतर खडकी पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला. फिर्यादी महिलेला न्याय मिळवून दिल्याचा आनंद वाटत आहे.- ऍड. योगेश आहेर आणि अमोल रायकर