अॅक्टिव्हावरील अल्पवयीन मुलाने ज्येष्ठ नागरिकाच्या दुचाकीला धडक दिल्याची घटना रविवारी नवी पेठेत घडली. या अपघातात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहेत. या प्रकारामुळे अल्पवयीन मुलांना वाहने चालविण्यास देण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
बाळासाहेब दगडू शेडगे (वय ६०, रा. जय भवानीनगर, पौड रस्ता) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पंधरा वर्षांच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेडगे हे रविवारी सकाळी नवी पेठेतील विठ्ठल मंदिरासमोरील रस्त्यावरून जात होते. त्या वेळी समोरून भरधाव आलेल्या अॅक्टिव्हा मोपेडवरील अल्पवयीन मुलाने त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये शेडगे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. तो मुलगा धडक दिल्यानंतर घटनास्थळी न थांबता पळून गेला. शेडगे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मुलांना वाहन दिल्यास मालकावर कारवाई
अल्पवयीन मुलास किंवा वाहन परवाना नसलेल्यास वाहन देणे हा कायद्याने गुन्हा आहे. गेल्या काही महिन्यात लहान मुलांनी चालवलेल्या वाहनाच्या धडकेत नागरिकांचे मृत्यू झाले आहेत. त्यामुळे आता यापुढे लहान मुलाच्या हातात वाहने दिसली, तर वाहतूक पोलिसांकडून वाहनाच्या मालकावर कारवाई केली जाईल, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा