राज्यात दर महिन्याला सरासरी १२५ ते १५० मातांचा बाळंतपणात मृत्यू होत असून त्यातील तब्बल ४५ टक्के मातांचा जीव वाचवणे शक्य असल्याचे समोर आले आहे. बाळंतपणानंतर होणारा रक्तस्त्राव, रक्तदाबाशी निगडित समस्या आणि जंतुदोष (सेप्सिस) ही मातामृत्यूंची प्रमुख कारणे असून, थोडीशी काळजी घेतल्यास ही सर्व कारणे टाळता येण्याजोगी असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
गेल्या वर्षी राज्यात १४०२ मातामृत्यू झाले आहेत. यांपैकी २० टक्के माता अतिरिक्त रक्तस्त्रावामुळे, १५ टक्के रक्तदाबाशी संबंधित समस्यांमुळे तर १० टक्के माता जंतुदोषामुळे मृत्यू पावल्या आहेत. तर या वर्षी जुलैअखेर झालेल्या मातामृत्यूंची संख्या ४३९ आहे.
‘फॉग्सी’ (द फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया) संस्थेच्या अध्यक्ष डॉ. हेमा दिवाकर म्हणाल्या, ‘‘देशातील ३६ टक्के मातामृत्यू रक्तस्त्रावामुळे होतात. बाळंतपण झाल्यानंतर तीन आवश्यक गोष्टी लगेच केल्या गेल्या तर यांतील ६० टक्के मातांना निश्चितपणे वाचवता येईल. बाळंतपणानंतर मातेला होणारा रक्तस्त्राव थांबवण्यासाठी तिला ऑक्सिटोसिन हे औषध दिले जाते. परंतु अनेक ठिकाणी हे औषध देण्यास उशीर होताना दिसतो. औषध शीतकपाटात ठेवलेले नसेल तर त्याची परिणामकारकता जवळपास ८० टक्क्य़ांनी कमी होते. या औषधाची योग्य प्रकारे साठवणूक होणे व ते लगेच दिले जाणे आवश्यक आहे. बाळाची नाळ कापण्याच्या वेळी काळजी घेणे आणि त्यानंतर रक्तस्त्राव थांबवण्यासाठी गर्भाशयास योग्य पद्धतीने मसाज करणे हे सर्व टप्पे काटेकोरपणे पाळले जाणे आवश्यक आहे. बाळंतपणानंतरचा पहिला एक तास मातेसाठी ‘गोल्डन अवर’ असतो. या काळात मातेवर उपचार करणाऱ्या व्यक्तींना मूळ समस्याच कळली नाही तर तिला वाचवणे कठीण होते.’’
गर्भवतीला बाळंतपणासाठी दवाखान्यात नेण्यासाठी उशीर होणे, वाहतुकीच्या समस्यांमुळे दवाखान्यात वेळेवर न पोहोचणे आणि दवाखान्यात गेल्यानंतर उपचारांना होणारा उशीर तिच्या जीवावर बेतत असल्याचे राज्याचे नोडल अधिकारी (पीसीपीएनडीटी) डॉ. सुधाकर कोकणे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘दर एक लाख जिवंत जन्मांमागे देशात होणाऱ्या मातामृत्यूंची संख्या २०० हून अधिक आहे. राज्यातील २००९ च्या आकडेवारीनुसार ही संख्या १०४ वर आणण्यात यश मिळाले आहे. प्रसूती सुरक्षित होण्यासाठी ती दवाखान्यातच होणे आवश्यक आहे. रक्तदाबाशी संबंधित समस्या टाळण्यासाठी गर्भवतीची नियमित तपासणी, तिची योग्य काळजी घेणे आणि वेळेपूर्वीच रुग्णालयात भरती करणे गरजेचे आहे.’’
गर्भारपणात रक्तदाबाच्या समस्यांसाठी मॅग्नेशियम सल्फेट हे औषध सुचवले जाते. मात्र त्याबाबतच्या अज्ञानामुळे केवळ ४० टक्केच गर्भवती या औषधाचा उपयोग करत असल्याचे डॉ. हेमा दिवाकर यांनी सांगितले. तसेच गर्भारपणात मातेला अॅनिमिया असणे हे १८ टक्के मातामृत्यूंचे थेट कारण ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, ‘‘ देशातील सुमारे ८० टक्के मुली आणि महिलांना अॅनिमिया आहे. गर्भवतीचे हिमोग्लोबिन खूपच कमी असेल तर बाळंतपणात होणारा थोडासा रक्तस्त्रावही तिच्या जिवास धोका निर्माण करू शकतो. त्यामुळे पौगंडावस्थेपासून अॅनिमिया आटोक्यात आणण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत. जंतुदोष टाळण्यासाठी बाळंतपणादरम्यान स्वच्छता पाळली जाणे आवश्यक आहे.’’
राज्यातील ४५ टक्के मातामृत्यू टाळणे शक्य
राज्यात दर महिन्याला सरासरी १२५ ते १५० मातांचा बाळंतपणात मृत्यू होत असून त्यातील तब्बल ४५ टक्के मातांचा जीव वाचवणे शक्य असल्याचे समोर आले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have a account? Sign in
First published on: 24-09-2013 at 02:50 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Death of women in pregnancy can be saved upto