पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशांअभावी उपचारास नकार दिल्याने गर्भवतीचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी राज्याच्या आरोग्य विभागाने चौकशीसाठी नेमलेल्या समितीने गर्भवतीच्या घरी जाऊन रविवारी तिच्या नातेवाइकांचे जबाब नोंदविले. दरम्यान, या प्रकरणी समितीने प्राथमिक अहवाल आरोग्य संचालकांकडे पाठविला असून, अंतिम अहवाल लवकरच सादर केला जाणार आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशासाठी उपचारास नकार दिल्याने ईश्वरी (तनिषा) भिसे या गर्भवतीचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. रुग्णालयानेही याप्रकरणी १० लाख रुपयांची अनामत रक्कम मागितल्याची कबुली दिली आहे. या सर्व प्रकरणाच्या चौकशीसाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे.
या समितीने रविवारी ईश्वरी भिसे यांच्या घरी जाऊन त्यांच्या नातेवाइकांचे जबाब नोंदविले. ईश्वरी यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेण्यात आले त्या दिवशी नेमके काय घडले, हे समितीने नातेवाइकांकडून जाणून घेतले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
प्राथमिक अहवालात रुग्णालयावर ठपका
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गर्भवतीला दाखल करून घेण्यासाठी १० लाख रुपये अनामत रक्कम मागितली होती. रुग्णाकडे आपत्कालीन स्थितीत रुग्णालय अशा प्रकारे पैसे मागू शकत नाही. त्यामुळे गर्भवती रुग्णालयात गेली त्या वेळी तिच्यासाठी आपत्कालीन स्थिती होती का, याची तपासणी राज्याच्या आरोग्य विभागाच्या समितीने केली आहे. यासाठी गर्भवतीच्या वैद्यकीय अहवालांच्या आधारे समितीने प्रसूती, स्त्रीरोग, हृदयविकार, फिजिशिअन अशा विविध तज्ज्ञांशी चर्चा केली. यात रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आला असून, याबाबतचा प्राथमिक अहवाल समितीने आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांच्याकडे सादर केला आहे. याबाबतचा अंतिम अहवाल लवकरच सादर केला जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
समितीकडून आतापर्यंत काय?
– दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टरांची चौकशी
– रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
– रुग्णालयाकडील रुग्णाचे वैद्यकीय अहवाल ताब्यात
– सूर्या हॉस्पिटल आणि मणिपाल हॉस्पिटलमधील डॉक्टरांचे जबाब
– गर्भवती आपत्कालीन स्थितीत होती का, याचा शोध
– प्राथमिक चौकशी अहवाल आरोग्य संचालकांकडे सादर