पुणे : राष्ट्रवादी काँगेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या कोल्हापूरमधील तरुणाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. प्रशांत पाटील (मूळ रा. कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. भुजबळ यांच्या कार्यालयात पाटील याने संपर्क साधला होता. त्याने भुजबळ यांना जीवे मारण्याची सुपारी मिळाली असल्याची धमकी दिली होती. भुजबळ यांच्या कार्यालयातील सहकाऱ्याला धमकी देणारा दूरध्वनी करण्यात आल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली होती.
भुजबळ सोमवारी (१० जुलै ) पुण्यात आले होते. धमकीचा दूरध्वनी आल्यानंतर पुणे पोलिसांकडे तक्रार देण्यात आली होती. पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने तातडीने तपास सुरु केला. भुजबळ यांच्या कार्यालयात धमकीचा दुरध्वनी करणारा तरुण महाड परिसरात असल्याची माहिती तांत्रिक तपासात मिळाली. त्यानंतर खंडणी विरोधी पथक महाडला रवाना झाले. पोलिसांच्या पथकाने पाटील याला महाड परिसरातून ताब्यात घेतले.
पोलिसांचे पथक पाटील याला घेऊन पुण्याकडे रवाना झाले आहे. पाटीलने दारुच्या नशेत भुजबळ यांच्या कार्यालयात संपर्क साधून जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस आयुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.