पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या भावाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तडीपार गुंडाला वानवडी पोलिसांनी अटक केली. श्रीधर उर्फ सोन्या विठ्ठल शेलार (वय ३५, रा. शांतीनगर, वानवडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शेलार सराईत असून त्याला पुणे शहर, जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. त्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिली हाेती.
तडीपार केल्यानंतर तो वानवडी परिसरात आला होता. दारुच्या नशेत असलेल्या शेलार याला पोलिसांनी सापळा लावून पकडले. त्याच्याकडून तीक्ष्ण शस्त्र जप्त करण्यात आले. पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे, उपनिरीक्षक संतोष सोनवणे, महेश गाढवे, अतुल गायकवाड, हरिदास कदम, विठ्ठल चोरमले, राहुल गोसावी आदींनी ही कारवाई केली.