पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय अधिसभेचा प्रारंभ वादळी चर्चा, वाद, हमरीतुमरीने झाला. अधिसभा सदस्य आणि व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच एकमेकांवर धावून जाण्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकारानंतर सुरक्षारक्षकांनी मध्यस्थी करीत वाद मिटवला. एका अधिसभा सदस्याने विद्यापीठ प्रशासनावर टीका करताना असंसदीय शब्दांचा वापर केल्याने विद्यापीठातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी एकत्र येत सभागृहातच ठिय्या आंदोलन करून घोषणाबाजी केली. या प्रकाराने कुलगुरूंवर अधिसभा स्थगित करण्याचीही वेळ आली.
विद्यापीठाची अर्थसंकल्पीय अधिसभा शनिवारी सकाळी मुख्य इमारतीतील संत ज्ञानेश्वर सभागृहात सुरू झाली. अधिसभेच्या सुरुवातीला कुलगुरूंकडून अहवाल सादर केला जातो. मात्र, या वेळी अधिसभा सदस्यांच्या मागणीनुसार स्थगन प्रस्तावांवरील चर्चेने कामकाज सुरू करण्यात आले. सुरुवातीपासूनच अधिसभा सदस्यांनी व्यवस्थापन परिषदेतील सदस्यांवर गंभीर आरोप केले. विद्यापीठाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमावरून अधिसभा सदस्यांनी काही व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांवर कार्यपद्धतीवर टीका केली.
अधिसभा सदस्यांच्या आरोपांनंतर व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या डॉ. ज्योत्स्ना एकबोटे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. एकबोटे म्हणाल्या, व्यवस्थापन परिषदेला लक्ष्य करण्यात येत आहे. सरसकट सर्वांना दोषी धरणे चुकीचे आहे. पैसे घेतल्याच्या आरोपांनी प्रचंड वेदना होत आहेत. त्यामुळे बोलताना काळजी घ्या.
बागेश्री मंठाळकर म्हणाल्या,‘सर्व सदस्य चुकीचे काम करत नाहीत. जे दोषी आहेत त्यांचे नाव घेऊन आरोप करा. आम्ही एक जबाबदारी घेऊन या पदांवर काम करत आहे.’
सागर वैद्य हे आरोपांना उत्तर देत असताना अधिसभा सदस्य अशोक सावंत आणि वैद्य हे एकमेकांवर धावून गेले. त्यामुळे सभागृहात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. अधिसभा सदस्यांनी केलेल्या आरोपांमुळे विद्यापीठातील अधिकारी नाराज झाले. त्यामुळे विद्यापीठातील कर्मचारी संघटनेने सभागृहात येऊन घोषणाबाजी सुरू केली. जवळपास दीड तास हा गोंधळ सुरू होता. त्यामुळे कामकाज तहकूब करावे लागले. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी मध्यस्थी करून वाद मिटवला.
अधिसभा सदस्याकडून महिलांबाबत अपशब्द
अधिसभा सदस्य सचिन गोरडे यांनी महिला कर्मचाऱ्यांबाबत असंसदीय शब्द वापरल्याने त्यांच्या निलंबनाची मागणी विद्यापीठातील कर्मचारी संघटनेने केली. त्यासाठी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. निलंबन केल्याशिवाय मागे न हटण्याचा निर्णय या कर्मचाऱ्यांनी घेतला. या प्रकरणात कुलगुरूंना दोन-तीन वेळा हस्तक्षेप करावा लागला. अखेर गोरडे यांनी सभागृहात दिलगिरी व्यक्त केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन स्थगित केले. कुलगुरूंनाही या प्रकाराबाबत खेद व्यक्त करावा लागला.
जीवनसाधना गौरव पुरस्कारांवरून आरोप
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांसाठी प्रशासनाची झालेली पळापळ, जीवनगौरव पुरस्कारांच्या खैरातीवर अधिसभा सदस्यांनी आक्षेप घेतला. अधिसभेला विचारात न घेता, व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांच्या मर्जीतल्या व्यक्तींची पुरस्कारासाठी निवड केली जात असून, यामुळे विद्यापीठाची प्रतिमा मलीन होत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. जीवनसाधना गौरव पुरस्कार घाऊक प्रमाणात वाटले जात असल्याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने दिले होते.