संजय जाधव

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : ओडिशातील बालासोर येथील रेल्वे दुर्घटनेला सिग्नल यंत्रणेतील दोष कारणीभूत ठरल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेतील शॉर्टकटचा गंभीर मुद्दा समोर आला आहे. रेल्वे मंडळाने रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून अवैध पद्धतीने सुरू असलेल्या या शॉर्टकटवर पुन्हा एकदा निर्बंध आणले आहेत. याचबरोबर सिग्नल दुरुस्ती आणि देखभालीची नियमावली आणखी कठोर केली आहे.
रेल्वे मंडळाचे सचिव रूपनारायण सुनकर यांनी देशभरातील सर्व विभागीय रेल्वेंना सिग्नल दुरुस्ती आणि देखभालीसंदर्भात पत्र पाठवले आहे. यानुसार रेल्वेच्या सिग्नलमध्ये शॉर्टकटचा वापर पूर्णपणे बंद होईल, याची काळजी घेण्यात आली आहे. रेल्वेच्या सिग्नलमध्ये बिघाड झाल्यास सिग्नल यंत्रणेचे मुख्य नियंत्रण असलेल्या रिले रूममध्ये जाऊन तो दुरुस्त करावा लागतो. रिले रूममध्ये जाऊन सिग्नल दुरुस्ती करण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे अनेक ठिकाणी रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी रिले रूमबाहेर सोईच्या ठिकाणी एक शॉर्टकट तयार करतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सिग्नलमध्ये बिघाड झाल्यास शॉर्टकटमधून तातडीने सिग्नल यंत्रणा सुरू केली जाते. यामागे प्रामुख्याने गाडय़ांना होणारा विलंब टाळण्याचा हेतू असतो. एखाद्या गाडीला विलंब झाल्यास पर्यायाने इतर गाडय़ांचे वेळापत्रक बिघडते. विलंब झाल्यास तातडीने वरिष्ठ पातळीवरून कारवाई केली जाते. हे टाळण्यासाठी स्थानिक पातळीवर रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी सिग्नल शॉर्टकटला प्राधान्य देतात, असे सूत्रांनी सांगितले. प्रत्यक्षात रेल्वेकडून अशा कोणत्याही सिग्नल शॉर्टकटला परवानगी दिली जात नाही. देशभरात स्थानिक अधिकारी त्यांच्या पातळीवर असे प्रकार करीत आहेत. बालासोर येथील रेल्वे दुर्घटनेला हा शॉर्टकट कारणीभूत ठरला असावा, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या अवैध सिग्नल शॉर्टकटचा वापर टाळला जावा, यासाठी रेल्वेने पावले उचलली आहेत. त्यानुसार सिग्नल दुरुस्ती आणि देखभालीची आणखी कठोर नियमावली जाहीर करण्यात आली आहे, असे सूत्रांनी सांगितले.

नवीन नियमावलीत काय?

नवीन नियमावलीनुसार, सिग्नलमध्ये बिघाड झाल्यास स्टेशन मास्तर आणि सिग्नल यंत्रणेचा कर्मचारी रिले रूमकडे जातील. रिले रूमला दुहेरी कुलूप व्यवस्था असेल. त्यातील एकाची चावी स्टेशन मास्तर आणि दुसरी सिग्नल कर्मचाऱ्याकडे असेल. दोघांनी मिळून रिले रूम उघडल्यानंतर दुरुस्ती केली जाईल. दुरुस्तीनंतर येणाऱ्या पहिल्या गाडीला थेट पुढे जाण्याचा सिग्नल दिला जाणार नाही. त्याऐवजी टप्प्याटप्प्याने सिग्नल देऊन गाडीचा वेग कमी ठेवला जाईल आणि दुर्घटना टाळण्याचा प्रयत्न केला जाईल. याचबरोबर या सर्व प्रक्रियेची लेखी नोंदही ठेवली जाईल.
रेल्वेच्या सिग्नल आणि दळणवळण यंत्रणेबाबत रेल्वे मंडळाने सर्व विभागांना पत्र पाठविले आहे. सिग्नल आणि दळणवळण यंत्रणेची देखभाल व दुरुस्ती याबाबत त्यात निर्देश देण्यात आलेले आहेत. – डॉ. रामदास भिसे, जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग, मध्य रेल्वे

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Debate in the signaling system has been blamed for the train accident at balasore in odisha amy