माहिती-तंत्रज्ञान कंपनीच्या बाहेर थांबून संगणक अभियंता तरुणांना डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड देण्याचे आमिष दाखवून त्यांची वैयक्तिक माहिती गोळा करायची आणि त्या मिळालेल्या माहितीच्या माध्यमातून तरुणांच्या नावाने डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड काढून लाखो रुपयांची खरेदी करायची असा प्रकार पुण्यात सर्रास सुरू होता. अभियंत्यांना फसवणाऱ्या या भामटय़ांचे बिंग पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने नुकतेच फोडले. भामटय़ांचे कोणतेही धागेदोरे हातात नसताना केवळ तांत्रिक तपासाद्वारे पोलिसांनी या भामटय़ांना पकडण्यात यश मिळवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हडपसर येथील मगरपट्टा भागात असलेल्या एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीतील संगणक अभियंता रोहित पिसाळ हा विशालनगर, पिंपळे निलख येथील रहिवासी आहे. तो क्रेडिट कार्डचा वापर करत नव्हता. गेल्या महिन्यांत २२ ऑगस्ट रोजी कोटक महिंद्रा बँकेतील एका कर्मचाऱ्याने रोहितशी संपर्क साधला आणि तुमच्या नावाने क्रेडिट कार्डवरून केलेल्या खरेदीपोटी ७५ हजार रुपये तुमच्याकडे थकीत आहेत असे त्याला सांगितले. हे ऐकून रोहित हडबडला. त्याने थेट कोटक महिंद्रा बँकेत धाव घेतली. मी क्रेडिट कार्ड वापरत नाही. त्यामुळे खरेदीचा प्रश्नच येत नाही, असे त्याने बँकेतील कर्मचाऱ्यांना ठणकावून सांगितले. त्यानंतर त्याने बँकेत शहानिशा करण्यास सुरुवात केली आणि कागदपत्रांची मागणी केली. तेव्हा सिटी बँकेचा खातेदार असलेल्या रोहितचे बँक व्यवहाराचे स्टेटमेंट मिळाले. ते स्टेटमेंट खरे होते. स्टेटमेंट पाहिल्यानंतर रोहित आणखी गोंधळून गेला. खरे स्टेटमेंट कोटक महिंद्रा बँकेकडे कसे आले, असा प्रश्न देखील त्याने उपस्थित केला. त्याच्या नावाने केलेले आधारकार्ड, कंपनीचे ओळखपत्र, पगाराची स्लीप, सही व त्यावरील छायाचित्र बनावट असल्याचे या वेळी निष्पन्न झाले. त्यानंतर रोहितने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. माहिती-तंत्रज्ञान कायदा आणि फसवणूक या कलमांअंतर्गत अज्ञात भामटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेनेही या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला. सायबर गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक सुनील पवार हे तांत्रिक तपासात निष्णात मानले जातात. सायबर गुन्हे उघडकीस आणण्यात पवार यांचा हातखंडा आहे. या सायबर फसवणुकीच्या गुन्ह्य़ाचा छडा कसा लावला, याबाबत माहिती देताना पवार म्हणाले, की रोहितची आम्ही चौकशी केली. तेव्हा मगरपट्टा भागातील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीच्या बाहेर दोन तरुण काही दिवसांपूर्वी थांबले होते आणि बँक कर्मचारी असल्याचे त्यांनी सांगितले होते. बँकेकडून क्रेडिट कार्ड देण्यात येत आहे, त्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही, असे त्यांनी सांगितले होते. त्यांनी ओळखपत्राची झेरॉक्सपत्र घेतली होती, अशी माहिती रोहितने पोलिसांना दिली. त्याआधारे तपास सुरू करण्यात आला. कोटक मिहद्रा बँकेत सादर करण्यात आलेल्या बनावट कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. सन २०१३ मध्ये मुंढवा पोलीस ठाण्यात बनावट क्रेडिट कार्डच्या गुन्ह्य़ात भैरवनाथ बाबुराव साळुंके (वय ३४, रा. धायकर वस्ती, मुंढवा) आणि पंकज अशोक टाक (वय ३३, रा. डुडुळगाव, ता. हवेली) या भामटय़ांना अटक करण्यात आली होती. त्या अनुषंगाने सहायक पोलीस निरीक्षक सचिन गवते यांना साळुंके आणि टाक बनावट क्रेडिट कार्ड तयार करण्यात पुन्हा सक्रिय झाल्याची माहिती मिळाली. ही माहिती पोलिसांच्या दृष्टीने महत्त्वाची होती.

साळुंके आणि टाक यांना पोलिसांनी सापळा लावून मुंढवा भागात पकडले. चौकशीत दोघांनी पिंपळे-निलख भागातील रोहित पिसाळ याला गंडविल्याचे निष्पन्न झाले. माहिती-तंत्रज्ञान कंपनांच्या बाहेर थांबून या दोघांनी क्रेडिट कार्ड देण्याच्या आमिषाने अनेक तरुणांना गंडा घातल्याची कबुली दिली. फसवणुकीसाठी त्यांनी बनावट कागदपत्रांचा वापर केला होता. दोघांनी इंड्सलँड बँक, बँक ऑफ इंडिया, अ‍ॅसपायर बँक या बँकांमध्ये जाऊन क्रेडिट कार्ड आणि कर्जप्रक रणांसाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याचे निष्पन्न झाले. सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दीपक साकोरे, सहायक आयुक्त अरुण वालतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील पवार, दीपक लगड, सहायक निरीक्षक सचिन गवते, सागर पानमंद, अस्लम अत्तार, अजित कुऱ्हे, अमित अवसरे, राजकुमार जाबा, सागर वाघमारे, नीतेश शेलार, बाळासाहेब कराळे, विजय पाटील, संतोष जाधव, राजू भिसे, नवनाथ जाधव, राहुल हंडाळ, भास्कर भारती यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी परिश्रम घेतले. साळुंके व टाक यांच्याकडून बनावट ५२ आधारकार्ड, २५ पॅनकार्ड जप्त करण्यात आली आहेत. या दोघांनी पुण्यातील २२ बँकांना बनावट कागदपत्रे सादर करून क्रेडिट कार्ड मिळविली आहेत. त्या बँकाशी सायबर गुन्हे शाखेने संपर्क साधला आहे. साळुंके आणि टाकने बँकांना सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. दोघांनी अनेक तरुणांना गंडा घातल्याचा संशय आहे. त्या दृष्टीने तपासही सुरू आहे.