पुणे-मुंबई दरम्यान अविरत धावणारी व सुरुवातीपासूनच प्रवाशांचीच नव्हे, तर कर्मचाऱ्यांचीही लाडकी ठरलेली डेक्कन क्वीन अर्थात दख्खनच्या राणीचा वाढदिवस सोमवारी पुणे रेल्वे स्थानकावर एका अनोख्या उत्साहात साजरा करण्यात आला. आपल्या या ‘ब्लू बर्ड बेबी’साठी तब्बल १२० किलोचा केक कापण्यात आला. सकाळी वाढदिवस साजरा झाल्यानंतर दुपारी या गाडीला नवीन ‘डायिनग कार’ जोडण्यात आल्याने प्रवाशांचा आनंद द्विगुणीत झाला.
डेक्कन क्वीन सकाळी सव्वा सातला पुणे स्थानकावरून सुटणार असल्याने सकाळी सहापासूनच वाढदिवसाची तयारी सुरू करण्यात आली होती. गाडीचे प्रवासी व चाहतेही सकाळी लवकरच स्थानकावर उपस्थित झाले होते. गाडीच्या इंजिनला हार व फुलांनी सजविण्यात आले. फलाट क्रमांक एकवर वाढदिवसाची तयारी करण्यात आली होती. रंगीबिरंगी फुगे व तब्बल १२० किलो वजनाचा केकही तयार ठेवण्यात आला होता. रेल्वेसाठी वापरण्यात येणारे लाल, पिवळा व हिरवा अशा तीन रंगाच्या सिग्नलच्या संकल्पनेतून हा केक तयार करण्यात आला होता.
पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे तसेच रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा व कार्यक्रमासाठी पुढाकार घेणाऱ्या हर्षां शहा यांच्या हस्ते केक कापण्यात आला. स्टेशन मास्टर सुनील कामठाण, गुरुराज सोना, जनसंपर्क अधिकारी संजय कुमार आदी अधिकारी, कर्मचारी व प्रवासी या वेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. ‘मर्डर मिस्ट्री’ या आगामी मराठी चित्रपटाचे कलाकारही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. केक कापताच प्रवाशांच्या उत्साहाला उधाण आले. फुगे फोडून आनंद साजरा करण्यात आला. उत्साहात अगदी शिट्टय़ाही वाजविण्यात आल्या. त्यामुळे स्थानकावरील वातावरण बदलून गेले होते.
डेक्कन क्वीनच्या वाढदिवशी प्रत्येक वर्षी हा उत्साह असतो. मात्र, यंदा या उत्साहाला एका वेगळ्या आनंदाचीही किनार होती. ती म्हणजे गाडीला आता नव्याने डायनिंग कार जोडण्यात आली आहे. वाढदिवस साजरा झाल्यानंतर रोजच्या वेळेला गाडी पुणे स्थानकातून बाहेर पडली. त्या नंतर दुपारी मुंबईमध्ये तिला डायनिंग कार जोडण्यात आली. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्याचे उद्घाटन केले.
८५ वर्षांच्या सेवेत केवळ ५० दिवसांची रजा
प्रवाशांची अत्यंत लाडकी ठरलेली डेक्कन क्वीन १९३० मध्ये सुरू झाली. आता या गाडीला ८५ वर्षे पूर्ण झाली आहेत. देशातील पहिली डिलक्स सुपरफास्ट गाडी असलेल्या डेक्कन क्वीनच्या अनेक वैशिष्टय़ांमध्ये  पुणे-मुंबई मार्गावर ८५ वर्षे धावताना तिने केवळ ५० रजा घेतल्या आहेत, हेही एक प्रमुख वैशिष्टय़ आहे. या रजाही तिने अपघात व अडचणीच्या प्रसंगीच घेतल्या आहेत. १३ जुलै १९९९ मध्ये अपघात झाल्याने गाडी नऊ दिवस बंद होती. अंबरनाथ येथे दंगलीमध्ये पाच डबे जळाल्याने पाच दिवस, तर मार्गावर दरडी कोरळल्याने इतर रजा तिला घ्यावा लागल्या.