पुणे : पुण्याहून मुंबईकडे जात असलेला डेक्कन क्वीन एक्स्प्रेसच्या वातानुकूलित डब्यांच्या खालून बुधवारी सकाळी धूर येऊ लागला. तातडीने गाडी थांबवून दुरुस्ती करण्यात आल्याने दुर्घटना टळली. कर्जत स्थानकानजीक ही घटना घडली.
पुणे-मुंबई डेक्कन क्वीन एक्स्प्रेस आज सकाळी पुण्यातून मुंबईकडे रवाना झाली. लोणावळ्यात थांबा घेतल्यानंतर गाडी पुढे मार्गस्थ झाली. कर्जत स्थानकाच्या अलीकडे गाडीच्या सी ३ आणि सी ४ या वातानुकूलित डब्यांखालून मोठ्या प्रमाणात धूर येऊ लागला. कर्जत स्थानकाच्या अलिकडे गाडी तातडीने थांबवण्यात आली. दुरुस्ती करून गाडी पुढे सोडण्यात आली. यामुळे गाडीला ३५ मिनिटे विलंब झाला.
वातानुकूलित डब्यांतील समस्या दूर करण्यात आली तरीही गाडीच्या वातानुकूलित डब्यांच्या दोनी बाजूने धूर निघत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली.
हेही वाचा : ९३ वर्षांपासून मुंबई-पुणेदरम्यान धावणारी सुपरफास्ट ‘डेक्कन क्वीन’ कल्याणला का थांबत नाही? कारण जाणून घ्या
दरम्यान, याआधी गाडीच्या डब्यांना आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. याआधी ऑक्टोबर २०१२ मध्ये गाडीच्या महिला डब्याला आग लागली होती. त्यात कोणतीही जीवितहानी झालेली नव्हती. त्यानंतर २० एप्रिल २०२३ रोजी गाडीच्या डब्यांखालून धूर निघाल्याने गाडीला पाऊण तास विलंब झाला होता. आता पुन्हा असाच प्रकार घडल्याने रेल्वेकडून गाडीच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी केला.