किडनी विकाराचे औषध देतो म्हणून तरुणाची एक लाखांची फसवणूक केल्याचा  प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल भुजंगराव खेनट (वय २४, रा. रहाटणी) याने याबाबत फिर्याद दिली आहे. त्यावरून डॉ. देशपांडे नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल याच्या आजीला किडनीच्या आजार असल्यामुळे थेरगाव येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले होते. गेल्या गुरुवारी राहुलला हॉस्पिटलमधील फोनवरून आरोपींने फोन केला. त्याने डॉक्टर देशपांडे बोलत असल्याचे सांगितले. राहुलच्या आजीच्या किडनी विकाराच्या उपचारासाठी औषध देतो, त्यासाठी विलास भास्कर आदमाने या व्यक्तीच्या खात्यावर वीस हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर एक लाख रुपये भरण्यास सांगितले. मात्र, कोणत्याही प्रकारचा उपचार न केल्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येतात राहुलने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी हे अधिक तपास करत आहेत.