बलात्काराच्या व स्त्री अत्याचाराच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त करत मुलींनी आपला पेहराव तसेच वागणे व्यवस्थित ठेवल्यास बरेच नकोसे प्रसंग टाळता येतील. केवळ मुलांना दोष देऊन चालणार नाही तर आपणही मर्यादेत राहिले पाहिजे, असे मत महापौर मोहिनी लांडे यांनी गुरुवारी िपपरीत व्यक्त केले.
जनअधिकार फाऊंडेशन आयोजित पहिल्या शिक्षण हक्क परिषदेचे उद्घाटन महापौरांच्या हस्ते झाले, तेव्हा त्या बोलत होत्या. आचार्य अत्रे रंगमंदिरात झालेल्या या कार्यक्रमास एमआयटीचे संस्थापक प्रा. विश्वनाथ कराड, एस. एन. पठाण, भाऊसाहेब अडागळे, धनंजय भिसे, मनोज कांबळे, मनोज तोरडमल, विनया तापकीर आदी उपस्थित होते.
महापौर म्हणाल्या, बलात्कारासारख्या घटना का घडतात, याचा गंभीरपणाने विचार केला पाहिजे. पालकांनी वयात आलेल्या मुला-मुलींकडे लक्ष दिले पाहिजे. गाव सोडून दूर आलेल्या मुली वसतिगृहात राहतात, त्यांचे राहणीमान कसे असते व त्यातील अनेक मुलींचे कपडे कसे असतात, याकडे पाहिले पाहिजे. अलीकडे मुली बिनधास्त झाल्या आहेत. अशातून नको ते प्रकार घडतात. केवळ मुलांना दोष देऊन चालणार नाही व त्याने हा प्रश्न सुटणारही नाही. मुला-मुलींवर चांगले संस्कार झाले पाहिजेत तरच पुढील काळात ‘नको ते’ प्रकार थांबतील. दिल्लीतील घटनेचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटले. या घटनेनंतर असे प्रकार होणार नाहीत, असे वाटत होते. प्रत्यक्षात त्यात वाढ झाल्याचे वर्तमानपत्र व टीव्हीतील बातम्यांतून दिसते.
मराठी शाळांमध्ये मुलांना उत्तम प्रकारे शिक्षण मिळते. त्यामुळे पालकांनी उगीचच इंग्रजी शाळांचा अट्टाहास धरू नये. शिक्षणात स्पर्धेचे वातावरण असले तरी पालकांनी तसा आग्रह पाल्यांकडे धरू नये, असे आवाहन महापौरांनी केले.
‘कोवळ्या कळ्या खुडू नका’
मातृ विद्यालयाची बाल विद्यार्थिनी श्रुती तोरडमल हिने ‘स्त्रीभ्रूण हत्ये’ वर छोटी नाटिका सादर करत सर्वाच्याच डोळ्यात अंजन घातले. ‘कोवळ्या कळ्या खुडू नका, मुलींना जगू द्या’ अशी साद तिने घालताच अनेकांचे डोळे पाणावले. तिचे सादरीकरण व अभिनय पाहून शिक्षण क्षेत्रातील दिग्गजही प्रभावित झाले. महापौरांनी आपल्या भाषणात श्रुतीचे कौतुक केले व तिला व्यासपीठावर बोलवून विशेष सत्कारही केला.

Story img Loader