आगामी विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील आघाडी तसेच जागावाटप याबाबतचा निर्णय हा दिल्लीतच होणार आहे. त्यामुळे राज्याच्या स्तरावर होणाऱ्या चर्चेचा काहीही अर्थ नाही, असे राज्याचे वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ‘एकदा वाजायला लागलं की सगळ्यांच्याच अंगात येतं’, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
लोकसभेतील यशाच्या जोरावर राष्ट्रवादीने विधानसभेला जादा जागांची मागणी केली असून प्रसंगी स्वबळावर लढण्याची भाषा केली आहे, याकडे लक्ष वेधले असता पतंगराव कदम म्हणाले,‘‘ कोण काय म्हणतो याकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही. काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हेच आघाडी आणि जागावाटपाबाबतचा निर्णय दिल्लीमध्ये घेणार आहेत. त्यामुळे खालच्या स्तरावरील चर्चेचा काहीही अर्थ नाही. आता भाजप आणि शिवसेना हे पक्षदेखील स्वबळावर लढण्याची भाषा करीत आहेत. गेली १५ वर्षे आम्ही आघाडी करून सत्ता राबवित आहोत. त्यामुळे ही आघाडी आम्ही तोडणार नाही. मात्र, त्यांना खुमखुमी असेल तर काँग्रेस स्वबळावर लढण्यास तयार आहे.’’
काँग्रेस पक्षाने केलेली चांगली कामे आम्ही जनतेपर्यंत पोहोचविण्यात कमी पडलो. केवळ भ्रष्टाचाराचीच जास्त चर्चा झाली. मोदी यांची लाट होती.  ते सत्तेवर आल्यानंतर बदल होईल या आशेने आमची बायका-पोरं यांनीही भाजपला मते दिली. पाहू काय होते ते. पण, काँग्रेस हा देशातील जुना पक्ष असून पक्षाने जय-पराजय पचवले आहेत. आमचा पक्ष तळागाळापर्यंत आहे, असेही पतंगराव कदम यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा