मराठा आरक्षण संदर्भात राणे समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात आला असून, तो प्राप्त होताच कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला बाधा न आणता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी किल्ले शिवनेरी येथे दिली.
शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरी येथे मराठा सेवा संघाने आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार वल्लभ बेनके, आमदार विनायक मेटे, बापू पठारे, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी सौरभ रॉय, पोलीस अधीक्षक मनोजकुमार लोहिया, आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, दिलीप वळसे पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवनेरी किल्ल्यावरील शिवजन्मस्थळी बाल शिवाजी यांचा पाळणा हलवून त्यांना अभिवादन केले. त्यानंतर शिवकुंज इमारतीतील आई जिजाऊ व बालशिवाजी यांचे स्मारकाला पुष्पहार घालून अभिवादन केले.
या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री म्हणाले की, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण व नोकरीमध्ये सवलत मिळावी यासाठी कायदेशीर व संबंधितांशी चर्चा करून मराठी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला जाईल. शिवरायांच्या अरबी समुद्रातील स्मारकाबाबत ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा व जगात कोठेही नाही असे भव्य व मोठे स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या पर्यावरण विभागाच्या परवानग्या घेण्याचे काम सुरू आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेले शिवनेरी हे प्रेरणास्थान असून शिवजयंती निमित्त महाराजांना अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्व जण उपस्थित आहोत. सर्व धर्मीयांनी बंधुत्व जपावे व जातीय सलोखा राखावा. महाराजांची संस्कृती सर्वानी जपावी.
मराठा आरक्षणाबाबत लवकरच निर्णय- मुख्यमंत्री
मराठा आरक्षण संदर्भात राणे समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात असून, तो प्राप्त होताच मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
First published on: 21-02-2014 at 03:13 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Decision about maratha reservation is in final stage cm