पुणे : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) ९६९ उमेदवारांना नोंदणी दिनांकापासून १०० टक्के दराने अधिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सरसकट अधिछात्रवृत्तीची मागणी करत आंदोलन करणाऱ्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने २५ जुलै रोजी एकूण ३ हजार ५४५ संशोधक उमेदवारांपैकी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी करून, शपथपत्र घेऊन ५० टक्के दराने सरसकट अधिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय घेतला होता. ३ हजार ५४५ उमेदवारांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) ७६३, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (महाज्योती) १४५३ आणि सारथीच्या १३२९ उमेदवारांचा समावेश होता. मात्र, बार्टीच्या ७६३ उमेदवारांना कागदपत्र पडताळणी करून शपथपत्र घेऊन सरसकट १०० टक्के दराने अधिछात्रवृत्तीचा लाभ देण्यास सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने १० सप्टेंबर रोजी मान्यता दिली.

हेही वाचा >>>टोमॅटो, कोबी, ढोबळी मिरचीच्या दरात वाढ

या पार्श्वभूमीवर बार्टीच्या उमेदवारांना सरसकट लाभ दिला जात असताना सारथीच्या संशोधक उमेदवारांना ५० टक्के दराने अधिछात्रवृत्ती देऊन सरकार भेदभाव करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच सारथीच्या उमेदवारांना सरसकट १०० टक्के दराने अधिछात्रवृत्तीचा लाभ देण्याची मागणी केली होती. त्यासाठी निवेदने देण्यात आली, आंदोलने करण्यात आली. अखेरीस बार्टीच्या धर्तीवर सारथीच्या ९६९ उमेदवारांना नोंदणी दिनांकापासून १०० टक्के दराने अधिछात्रवृत्तीचा लाभ देण्याचा निर्णय नियोजन विभागाने घेतला.

हेही वाचा >>>हृदयविकारावर ८६ वर्षीय वृद्धाची मात! ऑरबिटो-ट्रिप्सी उपचार प्रक्रियेविषयी जाणून घ्या…

गेल्या दोन वर्षांपासून सरसकट अधिछात्रवृत्तीची मागणी लावून धरण्यात आली होती. अखेरीस सरकारने त्याबाबत निर्णय घेतला आहे. त्यामुळे उमेदवारांना दिलासा मिळाला आहे, अशी भावना संशोधक उमेदवार सौरभ शिंदे यांनी व्यक्त केली.