पुणे : राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखड्यात (एनआयआरएफ) राज्यातील विद्यापीठांची पीछेहाट झाल्याने आता विद्यापीठांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी आणि स्पर्धात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी विद्यापीठ विभाग क्रमवारी आराखडा (यूडीआरएफ) तयार करण्यात आला आहे. त्यात विद्यापीठातील विभागांच्या कामगिरीचे मूल्यांकन करून विभागांची क्रमवारी जाहीर केली जाणार आहे.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक विभागातील विभागातील संशोधनाला चालना देणे, विद्यार्थिकेंद्रित उपक्रम राबवणे, स्पर्धात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी विद्यापीठाअंतर्गत विभागांना मानांकन देण्याचा उपक्रम राबवला. त्याचे चांगले परिणाम दिसून आले. त्यामुळे हा उपक्रम राज्यातील विद्यापीठांमध्ये राबवण्याची आवश्यकता निदर्शनास आली. त्यानुसार आता एनआयआरएफ, क्यूएस क्रमवारीनुसार सर्व अकृषी आणि सार्वजनिक विद्यापीठांचा शैक्षणिक दर्जा उंचावणे, संशोधनाला चालना देण्याच्या उद्देशाने विद्यापीठांतील विभागांच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जाणार आहे. त्यात १ जुलै ते ३० जून या शैक्षणिक वर्षातील विभागांच्या शैक्षणिक, संशोधन आणि इतर कामगिरी विचारात घेऊन विद्यापीठाकडूनच मूल्यांकन करून विभागांची क्रमवारी जाहीर करण्याची कार्यवाही जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत करण्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

विभागांच्या मूल्यांकनाबाबतच्या उपक्रमाचे परिपत्रक संबंधित विद्यापीठांनी जुलैच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध करावे. विभागांनी आवश्यक ती कागदपत्रे दोन आठवड्यांत संबंधित प्रणालीवर अपलोड करावी. बाहेरच्या तज्ज्ञ समितीकडून मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. त्यांच्या अहवालानुसार विभागांची क्रमवारी जाहीर करावी. निकषांनुसार सर्वोच्च गुणप्राप्त विभागास अनुदान, प्रशस्तिपत्र, सन्मानचिन्ह प्रदान करावे. निकषांनुसार कमी गुण मिळालेल्या विभागांनी त्यांचे मूल्यांकन उंचावण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याबाबत नमूद करण्यात आले आहे.

मूल्यांकनाची कार्यपद्धती

विद्यापीठांच्या विभागांच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी पाच निकष निश्चित करण्यात आले आहेत. एकूण ७२५ गुणांसाठी मूल्यांकन केले जाणार आहे. त्यात प्राध्यापकांनी केलेले संशोधन आणि व्यावसायिक उपक्रमांसाठी ३०० गुण, नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आणि अध्यापन प्रक्रियेसाठी १०० गुण, प्रशासन आणि विभागीय कार्यप्रणालीसाठी ११० गुण, विद्यार्थ्यांच्या प्रगती आणि संधींसाठी १४० गुण, तर कार्यशाळा, संमेलन आणि सहकार्य उपक्रमांसाठी ७५ गुण दिले जाणार आहेत.

चालू वर्षात मार्च ते मे दरम्यान मूल्यांकन प्रक्रिया

दर वर्षी वेळापत्रकानुसार विद्यापीठांतर्गत सर्व विभागांच्या गेल्यावर्षीच्या कामगिरीचे मूल्यांकन जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत होणे अपेक्षित आहे. मात्र, चालू वर्षात हा कालावधी उलटून गेला असल्याने केवळ या वर्षापुरता हा कालावधी मार्च ते मे २०२५ असा राहील. त्यामुळे चालू वर्षासाठी विद्यापीठांनी वेळापत्रक आखून उपक्रमाची सुरुवात करावी. पुढील शैक्षणिक वर्षापासून उपक्रमाचा कालावधी जुलै ते ऑक्टोबर असा राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Story img Loader