चिन्मय पाटणकर
पुणे : व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी बारावीचे गुण आणि राज्य सामायिक प्रवेश परीक्षेतील (सीईटी) गुण एकत्र करण्याबाबत लवकरच प्रस्ताव पाठवण्यात येईल. तसेच या संदर्भात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर बैठक घेणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. खासगी शिकवण्यांमुळे विद्यार्थी वर्गात अनुस्थित राहण्याच्या प्रकारांना चाप लावण्यासाठी फेस रेकग्निशनद्वारे विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा >>> ‘भिडे वाडा स्मारका’चा प्रश्न अखेर निकाली; उच्च न्यायालयातील खटल्यामध्ये पुणे महापालिकेचा विजय
राज्यस्तरीय शैक्षणिक बैठकीनंतर केसरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओल आणि शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांना सीईटी आणि बारावीच्या गुणांचा प्रवेशासाठी विचार करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
शिक्षण विभागात तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येत आहे. त्यानुसार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची अनुपस्थिती तपासण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल. त्यासाठी वर्गात कॅमेरे बसवण्याबाबत चाचपणी सुरू आहे. शाळा मान्यतेपासूनची सर्वच प्रक्रिया ऑनलाइन करण्यात येणार आहे. तसेच या प्रणालीमुळे शिक्षकांना करावे लागणारे प्रशासकीय काम काही प्रमाणात कमी होईल, असेही केसरकर यांनी सांगितले.
हेही वाचा >>> पुणे : गणवेश परिधान केला नाही, सहायक पोलीस आयुक्तांना न्यायालयाची कारणे दाखवा नोटीस
राज्य सरकारने पाचवी आणि आठवीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याच वर्गात पुन्हा ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची कार्यवाही यंदापासून करण्यात येणार आहे. परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेतली जाणार आहे. त्यात अनुत्तीर्ण झाल्यास त्याच वर्गात ठेवले जाईल, असे केसरकर यांनी सांगितले.
त्यापेक्षा कनिष्ठ महाविद्यालय सुरू करावे…
शहरातील कनिष्ठ महाविद्यालयासह संगमनत करून खासगी शिकवणी वर्गात विद्यार्थ्यांना शिकवले जाते. त्यामुळे अकरावी बारावीच्या वर्गात विद्यार्थी अनुपस्थित असतात. शिकवणीचालकांनी शिकवणी वर्ग चालवण्यापेक्षा स्वत:चे कनिष्ठ महाविद्यालय सुरू करून विद्यार्थ्यांना शिकवावे. शिकवणी वर्गचालकांनी कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याची परवानगी मागितल्यास त्यांना ती देण्यात येईल, असे केसरकर यांनी सांगितले.
भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई
शिक्षण विभागात भ्रष्टाचार अजिबात खपवून घेण्यात येणार नाही. भ्रष्टाचाराच्या विविध प्रकरणांमध्ये सापडलेल्या साधारण ३३ अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. या अधिकाऱ्यांना ‘साइड पोस्टिंग’ दिली जाणार आहे. भ्रष्ट अशा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे केसरकर यांनी सांगितले.