पिंपरी : महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सुरू असलेली धन्वंतरी आरोग्य याेजना बंद करून विमा योजना लागू करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी घेतला आहे. यासाठी विमा कंपनीच्या खात्यात २७ काेटी ७३ लाख रुपये वर्गही करण्यात आले आहेत.
महापालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी, तसेच कुटुंब व्याख्येनुसार, त्यांच्यावर अवलंबून असणारे कुटुंबीय आणि सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी धन्वंतरी आरोग्य योजना एक सप्टेंबर २०१५ पासून सुरू करण्यात आली होती. धन्वंतरीचे महापालिका आस्थापनेवरील सहा हजार ८२७ आणि निवृत्तिधारक अडीच हजार असे एकूण नऊ हजार ३२७ सभासद आहेत. योजना सुरू झाल्यानंतर कुटुंब व्याख्येनुसार कर्मचारी, त्यांचे आई, वडील, दोन मुले अशा पाच व्यक्तींचा समावेश कर्मचाऱ्यांच्या अवलंबितांमध्ये करण्यात आला होता.
हेही वाचा >>>आसाममध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा, विराज खटावकर यांनी साकारला सात फूट उंचीचा पुतळा
आता धन्वंतरी योजना बंद केली आहे. त्याऐवजी विमा योजना लागू केली आहे. विमा योजनेसाठी महापालिका सेवेत कार्यरत असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून दरमहा ३०० रुपये इतका स्वहिस्सा आणि निवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून दरमहा १५० रुपये स्वहिस्सा जमा केला जाणार आहे. एकूण जमा होणाऱ्या हिश्श्याच्या दुप्पट रक्कम महापालिका विमा योजना निधीत जमा करणार आहे. या योजनेत तीन लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार केले जाणार असून, त्यापुढे मोठा आजार असेल, तर २० लाखांपर्यंत उपचार केले जाणार आहेत. या अंतर्गत देशातील मान्यताप्राप्त सात हजार रुग्णालयांमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांना माेफत उपचार घेता येणार आहेत.
विमा योजनेसाठी आयुक्तांवर दबाव?
धन्वंतरीऐवजी महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना विमा योजना लागू करावी, यासाठी आयुक्त शेखर सिंह यांच्यावर दबाव हाेता असे समजते. त्यामुळे दाेन दिवसांत विमा लागू करण्याची प्रक्रिया अधिकाऱ्यांकडून करून घेतली. दाेन दिवसांपूर्वी रात्री उशिरा योजनेचा एका वर्षाचा खर्च म्हणून २७ काेटी ७३ लाख रुपये न्यू इंडिया इन्शुरन्स या कंपनीला आरटीजीएसद्वारे वर्ग केले आहेत.