लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : उष्णतेच्या लाटेचा परिणाम विचारात घेऊन राज्यातील शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, दोन सत्रांत भरणाऱ्या शाळांना या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात अडचणी येणार असून, विद्यार्थी वाहतुकीतील अडचणींसह नोकरदार पालकांचे वेळापत्रकही बिघडण्याची शक्यता आहे.

याबाबत माजी मुख्याध्यापक महेंद्र गणपुले म्हणाले, ‘सकाळच्या सत्रात शाळा भरवण्याच्या निर्णयामुळे दोन सत्रांत भरणाऱ्या शाळांना अडचण येऊ शकते. किमान चार घड्याळी तास कामकाज होणे आवश्यक आहे. तसेच, नोकरदार, व्यावसायिक पालकांचे वर्षभराचे वेळापत्रक बिघडणार आहे. मात्र, पालकांनीही थोडी तडजोड करणे गरजेचे आहे. विद्यार्थी वाहतुकीचाही प्रश्न येऊ शकतो. वाहतूक सेवा पुरवठादारांनीही वेळेची तडजोड केली पाहिजे.’

उष्णतेच्या लाटेमुळे आरोग्याविषयी गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन काही दिवसांपूर्वी महसूल आणि वन विभागाने, परिपत्रकाद्वारे मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. तसेच, राज्यात वाढलेल्या उन्हाच्या तडाख्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम टाळण्यासाठी विविध संघटनांकडून शाळांची वेळ सकाळची करण्याबाबत निवेदने देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर, राज्यातील सर्व शाळांच्या वेळापत्रकांत एकवाक्यता आणण्यासाठी निर्देश देण्यात आले.

त्यानुसार, सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक शाळांची वेळ सकाळी सात ते सव्वाअकरा, तर माध्यमिक शाळांची वेळ सकाळी सात ते पावणेबारा अशी करण्याचे निर्देश देण्यात आले असून, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेने या कालावधीमध्ये बदल करता येतील, असे परिपत्रक प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी प्रसिद्ध केले.

दोन सत्रांत भरणाऱ्या शाळा त्यांच्या स्तरावर बदल करू शकतात. त्यात स्वत:ची काळजी घेऊ शकणाऱ्या मोठ्या मुलांची शाळा थोडी उशिराने, तर लहान मुलांची शाळा सकाळी लवकर भरवणे शक्य आहे. सकाळच्या सत्रात शाळा भरवण्यामागे कोणत्याही विद्यार्थ्याला उष्माघाताचा त्रास होऊ नये, हा विचार आहे, असे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी नमूद केले.