पुणे : कोलकत्यातील वैद्यकीय महाविद्यालयात निवासी डॉक्टरवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. या पार्श्वभूमीवर बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयातील महिला निवासी डॉक्टरांची सुरक्षितता वाढविण्याचा निर्णय महाविद्यालय प्रशासनाने घेतला आहे. महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालयात आणखी ८३ सुरक्षारक्षक नेमले जाणार आहेत. याचबरोबर आवारात आणखी १०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत.
कोलकत्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयातील सुरक्षा उपाययोजनांचा आढावा अधिष्ठाता डॉ.एकनाथ पवार यांनी सोमवारी घेतला. या बैठकीला बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. यलप्पा जाधव, उपअधीक्षक डॉ. सोमनाथ खेडकर, अधिसेविका आणि मार्ड पुणेचे उपाध्यक्ष डॉ.दस्तगीर जमादार आदी उपस्थित होते. या बैठकीत महाविद्यालय आणि रुग्णालयातील सुरक्षेबाबत चर्चा करण्यात आली. सुरक्षारक्षक आणि सीसीटीव्हींची संख्या वाढविण्याचा निर्णय या बैठकीत झाला.
आणखी वाचा-डॉक्टरांच्या संघटनांत महिलांना नगण्य स्थान! देशभरातील ४६ पैकी केवळ ९ संघटनांचे अध्यक्षपद
याबाबत अधिष्ठाता डॉ. पवार म्हणाले की, महाविद्यालय आणि ससून रुग्णालयाच्या आवारात मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत. महिला डॉक्टरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढविली जाणार आहे. सध्या महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या आवारात ३५३ सीसीटीव्ही कॅमेरे असून, आणखी १०० कॅमेरे बसविले जाणार आहेत. याचबरोबर सध्या २२० सुरक्षारक्षक असून, आणखी ८३ सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडे पाठविण्यात आला आहे. याला मंजुरी मिळाल्यानंतर तातडीने या नियुक्त्या होतील.
महाविद्यालय आणि रुग्णालयाचे आवार खूप मोठे आहे. आपत्कालीन प्रसंगी अनेक महिला निवासी डॉक्टरांना रात्रीच्या वेळी एका विभागातून दुसऱ्या विभागात जावे लागते. या विभागांच्या इमारतींमधील अंतर अधिक आहे. यामुळे रात्रीच्या वेळी महिला सुरक्षारक्षक या डॉक्टरांसोबत सध्या सोबतीला देण्यात येत आहेत. याचबरोबर महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या आवारात सुरक्षारक्षक वेळोवेळी गस्त घालत आहेत. आवारात काही ठिकाणी पुरेसा उजेड नाही. अशा ठिकाणी पुरेशी प्रकाश व्यवस्था करण्यात येत आहे, असेही डॉ. पवार यांनी नमूद केले.
आणखी वाचा-मोठी बातमी ! पोर्श अपघात प्रकरणात आणखी दोघांना अटक
निवासी डॉक्टरांचा संप
कोलकत्यातील घटनेचा निषेध करण्यासाठी मार्डच्या वतीने १३ ऑगस्टपासून बेमुदत संप सुरू करण्यात आला आहे. बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातील ५६६ निवासी डॉक्टरांपैकी ३८६ संपात सहभागी झाले असून, १८० कामावर आहेत. याचबरोबर एमबीबीएस पदवीचे २५० अंतर्वासित विद्यार्थीही या संपात सहभागी झाले आहेत. यामुळे रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात रुग्णांच्या तपासणीसाठी इतर विभागातील शिक्षकांची मदत घेतली जात आहे. या संपामुळे ससून रुग्णालयातील रुग्णसेवेवर मोठा परिणाम होत आहे.
ससूनमधील रुग्णसेवा
प्रकार | १९ ऑगस्ट (दुपारी २ पर्यंत) | रोजची सरासरी |
बाह्यरुग्ण विभाग | ८३२ | १६७० |
मोठ्या शस्त्रक्रिया | १८ | ४८ |
लहान शस्त्रक्रिया | २८ | १४५ |
प्रसूती | ११ | २४ |
बी.जे.वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला आहे. काही ठिकाणी सुरक्षा वाढविण्याची गरज आहे. अशा ठिकाणी सुरक्षा उपाययोजना तातडीने करण्याची पावले उचलली जात आहेत. संस्थेचा परिसर सुरक्षित राहावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. -डॉ. एकनाथ पवार, अधिष्ठाता, बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय
© The Indian Express (P) Ltd