लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : पुणे महापालिकेच्या विविध विभागांतील कर्मचारी-अधिकारी कार्यालयात वेळेवर हजर राहत नसल्याच्या तक्रारी महापालिका आयुक्त कार्यालयाकडे करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वेळेवर कार्यालयात हजर नसलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात होणार आहे. यासाठी महापालिका कर्मचारी, अधिकारी यांचे वेतन बायोमेट्रिक हजेरीनुसार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेच्या ज्या कार्यालयात काम नेमून दिले आहे, त्यासाठी वेळेत हजर राहावे, अशा सूचना महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी अनेकदा केल्या आहेत. मात्र, वारंवार सूचना देऊनही महापालिकेतील अनेक अधिकारी, तसेच कर्मचारी कामाच्या वेळेत कार्यालयातून गायब असल्याचे दिसले आहे. याची गंभीर दखल घेऊन या पुढील काळात कर्मचाऱ्यांचे वेतन बायोमेट्रिक हजेरीनुसारच देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
बायोमेट्रिक हजेरी न तपासताच वेतन दिले गेल्याचे आढळल्यास संबंधित विभागाच्या प्रमुखांवरदेखील कडक कारवाई केली जाणार असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी यांनी सांगितले.
असा केला जातो कामचुकारपणा…
महापालिका कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा आहे. त्यानुसार सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी कामाची वेळ निश्चित करण्यात आली आहे. जेवणासाठी दुपारी २ ते २.३० वेळ आहे. मात्र, अनेक जण कार्यालयात सकाळी ११ वाजेपर्यंत येतात, तर सायंकाळी साडेपाच वाजताच कार्यालयातून घरी जातात. हे कर्मचारी बायोमेट्रिक नोंद न करता हजेरी पुस्तकात सह्या करतात.
‘नुसत्या सहीवर वेतन नाही’
‘हजेरी पुस्तकामध्ये वेळेची नोंद होत नसल्याने नुसत्या सह्यांवर संबधित कर्मचारी आणि अधिकाऱ्याचे वेतन निघते. मात्र, यापुढील काळात हजेरी पुस्तकानुसार उपस्थिती गृहीत धरून वेतन काढले जाणार नाही. संबधित कर्मचारी आणि अधिकारी यांच्या बायोमेट्रिक हजेरीची तपासणी करून त्यानंतरच त्यांचे वेतन दिले जाणार आहे,’ असे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.