पुणे : शहराचे सांस्कृतिक वैभव असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाचा निर्णय सर्व घटकांना विश्वासात घेऊन घेण्यात आला आहे. बालगंधर्वचा पुनर्विकास करताना त्यात व्यापारी संकुल असेल, अशा अपप्रचार जाणीवपूर्वक केला जात आहे. मात्र त्यामध्ये तथ्य नाही, अशी भूमिका माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी येथे मांडली. तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून अद्ययावत असे जागतिक दर्जाचे रंगमंदिर नियोजित वेळेत साकारण्यात येईल, असा दावाही त्यांनी केला.
बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास महापालिकेकडून करण्याचे प्रस्तावित आहे. मात्र बालगंधर्व रंगमंदिराची मूळ वास्तू पाडून तेथे नाटय़संकुल उभारण्यावरून मतप्रवाह आहेत. काही राजकीय पक्षांनी पुनर्विकासाला विरोध दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबरच चर्चा करून पुनर्विकासाबाबतची भूमिका पत्रकार परिषदेत मांडली.
बालगंधर्व रंगमंदिरामध्ये कला सादर करण्याची संधी मिळावी, अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. ५४ वर्षांपूर्वी बांधलेल्या बालगंधर्वला नव्याने उभारण्याची आणि व्यापक करण्याची आवश्यकता आहे. पुनर्विकासासंदर्भात समिती स्थापन करण्यात आली. समितीमध्येही पुनर्विकासाबाबत सहमती दर्शविण्यात आली. मात्र बालगंधर्वचा पुनर्विकास करताना त्यात व्यापारी संकुल असेल, अशा अपप्रचार जाणीवपूर्वक केला जात असून त्यात तथ्य नाही. केवळ विरोधाराला विरोध म्हणून खोटा प्रचार केला जात आहे. पुनर्विकास प्रकल्पात एक इंचही बांधकाम व्यावसायिक कारणासाठी नसेल, असे मोहोळ यांनी सांगितले.