लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : शहरातील रस्त्यांवर होणारी वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून संरक्षण विभागाच्या (कटक मंडळाच्या) हद्दीतून जाणाऱ्या शहराच्या पूर्व भागातील प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिकेने संरक्षण विभागाकडे यापूर्वी पाठविला असून, आता सुधारित प्रस्ताव महापालिकेकडून पाठविण्यात येणार आहे.
संरक्षण विभागाच्या हद्दीत असलेल्या महत्त्वाच्या रस्त्यांच्या रुंदीकरणाबाबत विभागीय आयुक्तांकडे नुकतीच महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीस महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, संरक्षण विभाग, पोलीस प्रशासन, संरक्षण विभागाचे अधिकारी, कँटोन्मेंट बोर्डाचे अधिकारी उपस्थित होते.
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत.
वाहनांची संख्या वाढत असल्याने वाहतुकीच्या कोंडीत देखील मोठी वाढ झाली आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेच्या पथ विभागाकडून शहातील प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण केले जात आहे. मात्र, या रस्त्यांना जोडणारे अनेक पर्यायी रस्ते सरंक्षण विभागाच्या हद्दीतून जातात. हे रस्ते वाहतुकीसाठी खुले असले तरी त्यांचे रुंदीकरण विकास आराखड्यानुसार (डीपी) होणे आवश्यक आहे.
या रस्त्यांवर गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिका आणि पोलिसांकडून या रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यानुसार, रस्ते रुंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या रस्त्यांमध्ये कल्याणीनगर पूल ते पिंगळे वस्ती (नाॅर्थ मेन रस्ता), गोळीबार मैदान ते कोंढवा, लुल्लानगर (गंगाधाम चौक परिसर), घोरपडी रस्ता ते भैरोबानाला रस्ता, भैरोबा नाला ते नेताजीनगर रस्ता या रस्त्यांचा समावेश आहे.
या रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी जागा मिळाव्यात अशी मागणी करणारे पत्र महापालिकेकडून संरक्षण विभागास देण्यात आले होते. मात्र, त्याबाबत संरक्षण विभागाकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे महापालिकेकडून विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून सर्व विभागांची संयुक्त बैठक घेण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार, सर्व विभागांनी एकत्र नियोजन करत या प्रकरणी सर्व विभागांनी शहरासाठी योग्य निर्णय घ्यावा अशा सूचना विभागीय आयुक्तांंनी केल्या आहेत.
संरक्षण विभागाच्या सूचनेनुसार महापालिकेने आवश्यक असलेल्या जागांबाबत सुधारित प्रस्ताव दाखल करावेत, अशा सूचनाही या बैठकीत महापालिकेला देण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता नवीन प्रस्ताव संरक्षण विभागाला देण्यात येणार असल्याचे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.