विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येतात. मात्र, लोकसभा निवडणुकीत खासदारकीचे उमेदवार पराभूत होतात, हे कसे काय होते, असा प्रश्न राष्ट्रवादीच्या निरीक्षकाने पिंपरीत पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केला. लोकसभेतील पराभव टाळायचा असल्यास लवकर उमेदवार जाहीर करा, अशी सूचना अनेक पदाधिकाऱ्यांनी केली.
राष्ट्रवादीच्या पिंपरी कार्यालयात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीस निरीक्षक नरसिंग मेंगजी, शहराध्यक्ष योगेश बहल, शिक्षण मंडळाचे सभापती विजय लोखंडे यांच्यासह सिद्धेश्वर बारणे, शरद बोऱ्हाडे, राजेश पिल्ले, नीलेश पांढारकर, फारूक इनामदार, विश्रांती पाडाळे, ज्ञानेश्वर कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर दिल्ली-मुंबईत उच्चस्तरीय बैठका होणार आहेत, त्यासाठी पूर्वतयारी म्हणून निरीक्षकांच्या आढावा बैठका होत आहेत. पिंपरीतील बैठकीसाठी निरीक्षक मेंगजी आले होते. त्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दीड तास चर्चा झाली. त्यामध्ये अनेकांनी सूचना मांडल्या तर काहींनी तक्रारींचा सूर आळवला.
मागील वेळी मावळ व शिरूरचे उमेदवार उशिरा जाहीर झाले, त्यामुळे प्रचारासाठी व मतदारापर्यंत पोहोचण्यास उशीर झाला, त्याचा फटका बसला. यंदा ती चूक होऊ नये, त्यासाठी लवकरात लवकर उमेदवार जाहीर करावा, अशी सूचना अनेकांनी केली. सर्वाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर निरीक्षकांनी पक्षाची भूमिका विस्ताराने मांडली. ग्रामीण भागात आपल्या पक्षाचे उमेदवार विधानसभेवर निवडून येतात. मात्र, त्याच भागात लोकसभेच्या उमेदवाराला मतदान होत नाही. आपले आमदार निवडून येतात. मात्र, खासदारकीला पराभव पत्करावा लागतो. आपण नेमके कुठे कमी पडतो, आपल्यातील त्रुटी काय आहेत, याचा अभ्यास करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Story img Loader