पुणे : सलग सुट्ट्यांमुळे फळभाज्या आणि पालेभाज्यांना फारशी मागणी नाही, त्यामुळे बहुतांश फळभाज्या आणि पालेभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (३० एप्रिल) राज्य, तसेच परराज्यांतून ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. गुजरात, कर्नाटकमधून मिळून ६ टेम्पो हिरवी मिरची, गुजरात, कर्नाटकमधून मिळून ५ टेम्पो कोबी, हिमाचल प्रदेशातून ५ ट्रक मटार, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडूतून ३ टेम्पो शेवगा, कर्नाटकातून २ टेम्पो घेवडा, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातून मिळून तोतापुरी कैरी ५ टेम्पो, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून मिळून १५ ट्रक लसूण, आग्रा, इंदूर, तसेच पुणे विभागातून मिळून ४० ट्रक बटाटा आवक झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख आडते विलास भुजबळ यांनी दिली.
हेही वाचा – पुणे : लग्नसराईमुळे फुले तेजीत, फुलांच्या दरात दहा टक्के वाढ
पुणे विभागातून सातारी आले दीड हजार गोणी, टोमॅटो ८ हजार पेटी, हिरवी मिरची ३ टेम्पो, फ्लाॅवर १० टेम्पो, कोबी ५ टेम्पो, भेंडी ५ टेम्पो, गवार ५ टेम्पो, शेवगा ३ टेम्पो, काकडी ८ टेम्पाे, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, गाजर ६ टेम्पो, तांबडा भोपळा १० टेम्पो, मटार १०० गोणी, कांदा १०० ट्रक अशी आवक झाली.
हेही वाचा – पुणे : उन्हाळ्यामुळे रसाळ फळांना मागणी
पालेभाज्यांना फारशी मागणी नाही. पालेभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली. रविवारी तरकारी विभागात एक लाख कोथिंबिरीच्या जुडी, मेथीच्या ५० हजार जुडींची आवक झाली. किरकोळ बाजारात कोथिंबीर, मेथीची विक्री प्रतवारीनुसार प्रतिजुडी २० ते ३० रुपये दराने केली जात आहे.