पुणे: अक्षय्य तृतीयेला आंब्यांच्या मागणीत मोठी वाढ होत असते. मात्र, यंदा अक्षय्य तृतीयेसाठी बाजारात आंब्याचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणावत असून बाजारात हापूसची आवक कमी प्रमाणावर होत आहे.अक्षय्य तृतीयेला पूर्वजांना आंब्यांचा नैवेद्य अर्पण केला जातो. गुढीपाडव्यानंतर अक्षय्य तृतीयेला आंब्यांच्या मागणीत मोठी वाढ होते. ग्राहकांकडून तयार आंब्यांना मागणी असते. गेल्या काही महिन्यांपासून हवामानात सातत्याने चढउतार होत असल्याने आंब्यांच्या लागवडीवर परिणाम झाला आहे. अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर बाजारात आंब्यांची आवक कमी प्रमाणावर होत आहे. दरवर्षी पुण्यातील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमध्ये कोकणातून आठ ते दहा हजार हापूस आंब्यांच्या पेट्यांची आवक अक्षय्य तृतीयेसाठी होत असते. यंदा आंब्यांची आवक दररोज एक हजार पेटीपर्यंत होत असून किरकोळ बाजारात एक डझन आंब्यांचे दरही चढेच आहेत, अशी माहिती मार्केट यार्डातील आंबे व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते संघटनेचे सचिव करण जाधव यांनी दिली.
नोव्हेंबर महिन्यात, डिसेंबर महिन्यात काही भागात अवकाळी पाऊस झाला. हंगामाच्या पहिल्या टप्यात आंब्यांच्या झाडांना मोहोर चांगला आला. त्यानंतर बाजारात आंब्यांची आवक नियमित सुरू झाली. मार्च महिन्यात बाजारात आंब्यांची आवक अपेक्षेएवढी होत होती. फेब्रुवारी महिन्यात दिवसा प्रचंड ऊन पडत होते. रात्री तापमानात घट होत होती. त्यामुळे दुसऱ्या बहरातील मोहोर गळला. परिणामी एप्रिल महिन्यात आंब्यांच्या दुसऱ्या बहरातील आवक कमालीची घटली, असे आंबा व्यापारी नितीन कुंजीर यांनी सांगितले.
हेही वाचा >>>‘त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही’, मलिकांच्या दाव्यानंतर पवारांचे टीकास्त्र
एप्रिलमधील हापूसची निचांकी आवक
दरवर्षी एप्रिल महिन्यात हापूसची आवक मोठ्या प्रमाणावर होते. एप्रिल महिन्यात आंब्यांची आवक वाढून दरही टप्प्याटप्प्याने सामान्यांच्या आवाक्यात येतात. गेल्या तीन दशकात एप्रिलमध्ये पहिल्यांदाच कोकणातील जयगड, देवगड, शिरगाव, पावस, जैतापूर परिसरातून होणारी आंब्याची आवक कमी झाली. आंबा लागवडीत घट झाल्याने त्याचा फटका छोट्या शेतकऱ्यांना बसला. अनेक छोटे बागायतदार पुणे, मुंबईतील बाजारात आंबे विक्रीस पाठवितात. मात्र, यंदा हवामान बदलामुळे आंबा लागवडीवर परिणाम झाला. छोटे बागायतदार वर्षभराचा घरखर्च आंबा लागवडीतून भागवतात. यंदा कोकणातील छोट्या बागयतदारांनी आंबा विक्रीस पाठविला नाही, असे निरीक्षण आंबा व्यापारी नितीन कुंजीर यांनी नोंदविले.
हेही वाचा >>>पिंपरी : निगडी पोलीस चौकीत महिलेची आत्महत्या
नेपाळी कामगार गावी परतले
गेल्या काही वर्षांपासून कोकणातील बागांमध्ये नेपाळी कामगार कामासाठी येतात. आंबा हंगामात कोकणात ८० ते ९० हजार नेपाळी कामगार येतात. यंदा आंबा लागवडीवर परिणाम झाल्याने नेपाळी कामगार बागायतदारांकडून हिशेब पूर्ण करून गावी परतल्याचे आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा >>>पुणे : नियोजनाच्या अभावामुळे विकासात अडथळे
आंब्यांचे दर
किरकोळ बाजारातील डझनाचे दर- ८०० ते १३०० रुपये
चार ते सहा डझन पेटी (घाऊक बाजारातील दर)-अडीच ते तीन हजार रुपये
पाच ते दहा डझन पेटी (घाऊक बाजारातील दर)- साडेतीन ते सहा हजार रुपये पेटी