पुणे : घरांच्या विक्रीत पुण्यात एप्रिलपासून सुरू झालेली घसरण अखेर ऑक्टोबरमध्ये थांबली आहे. गेल्या महिन्यात २० हजारांहून अधिक घरांची विक्री झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत घरांच्या विक्रीत ३९ टक्के वाढ नोंदविण्यात आली असून, यंदा दिवाळीमुळे गृहखरेदीत तेजी दिसून आली आहे.
पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवडमधील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल नाइट फ्रँक इंडियाने जाहीर केला आहे. या अहवालानुसार, पुण्यात ऑक्टोबरमध्ये २० हजार ८९४ घरांची विक्री झाली. यातून सरकारला ७५१ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क मिळाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत मुद्रांक शुल्क महसुलात ५२ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात १४ हजार ८९३ घरांची विक्री झाली होती आणि त्यातून ४९५ कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क मिळाले होते. यंदा जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत पुण्यात एकूण १ लाख ५९ हजार घरांची विक्री झाली असून, त्यातून ६ हजार कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क मिळाले आहे.
आणखी वाचा-झिकाचा धोका! राज्यात एकूण रुग्णसंख्या १४० वर; रुग्णांमध्ये गर्भवतींचे प्रमाण जास्त
यंदा पितृपक्ष २ ऑक्टोबरला संपला. गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या पहिले १४ दिवस पितृपक्ष होता. पितृपक्षाचा काळ नवीन वस्तूंच्या खरेदीसाठी अशुभ मानला जातो. त्यामुळे या काळात नागरिकांकडून घर अथवा वाहनाची खरेदी प्रामुख्याने टाळली जाते. यंदा ऑक्टोबरचे पहिले दोन दिवसच पितृपक्ष आल्याने आणि नंतर सणासुदीमुळे घरांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. पुण्यातील घरांच्या विक्रीत एप्रिल महिन्यापासून घट सुरू होती. अखेर ही घसरण थांबून ऑक्टोबरमध्ये घरांच्या विक्रीत वाढ झाली आहे.
पुण्यातील घरांची विक्री २०२४
महिना | घरांची विक्री | मुद्रांक शुल्क (कोटी रुपयांत) |
जानेवारी | १७,७८६ | ५८९ |
फेब्रुवारी | १८,७९१ | ६६२ |
मार्च | २२,१८९ | ८२२ |
एप्रिल | १४,२४४ | ५६६ |
मे | १२,२८० | ५४७ |
जून | १४,६९० | ५४५ |
जुलै | १३,७३१ | ५२१ |
ऑगस्ट | १३,३९७ | ५९२ |
सप्टेंबर | ११,०५६ | ५०८ |
ऑक्टोबर | २०,८९४ | ७५१ |
आणखी वाचा- पुणे: पतीने केली प्रेयसीची हत्या; पत्नीने आणि मेहुण्याने मृतदेहाची लावली विल्हेवाट
पुण्याच्या गृहनिर्माण बाजारपेठेने यंदा चांगली कामगिरी नोंदविली आहे. यावर्षी पहिल्या १० महिन्यांत घरांच्या विक्रीचा दीड लाखांचा टप्पा ओलांडण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांतील ही उच्चांकी विक्री आहे. दिवाळीसह इतर सणांमुळे ऑक्टोबरमध्ये घरांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. -शिशिर बैजल, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, नाइट फ्रँक इंडिया