पिंपरी : उद्योगनगरी असा नावलौकिक असणाऱ्या पिंपरी-चिंचवडमधील उद्योगांमध्ये घट झाली असून, गेल्या १७ वर्षांत शहरातील १२६ औद्योगिक भूखंडांचे निवासी, वाणिज्य भूखंडात रुपांतर झाले आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्र कमी होऊन त्या जागांवर बहुमजली गृहप्रकल्प, महापालिकेच्या वतीने नागरिकांसाठी अत्यावश्यक सुविधा उभारल्या जात आहेत.

औद्योगिक परिसरात छोट्या-मोठ्या दहा ते बारा हजार कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये लाखोंच्या संख्येने कामगार नोकरीला आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) परिसरात २२ ब्लॉक आहेत. तीन हजार एकरवर हा परिसर वसलेला आहे. महापालिकेकडे २००७ पासून औद्योगिक भूखंडाचे निवासी, वाणिज्य वापरात बदल करावेत, असे १२६ प्रस्ताव आले. या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे. या भागात टाटा मोटर्स, बजाज ऑटो, फोर्स मोटर्स, सॅण्डविक एशिया, ॲटलास कॉप्को, सेन्च्युरी एन्का, एसकेएफ, महिंद्रा अशा अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. तळवडे, चिखली, मोशी, आकुर्डी या भागातही मोठ्या संख्येने कारखाने आहेत. शहराची लोकसंख्या ३० लाखांवर पोहोचली असून, सहा लाख मालमत्ता आहेत. केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत (जेएनएनयूआरएम) शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली. सुसज्ज रस्ते, उड्डाणपूल, उद्याने, क्रीडांगणांसह पायाभूत सोई-सुविधा, महापालिकेने उभारलेल्या वैविध्यपूर्ण प्रकल्पांमुळे हा परिसर मालमत्ताधारकांच्या दृष्टीने आकर्षणाचा केंद्रबिंदू झाला आहे. त्यामुळे दर वर्षाला हजारो मालमत्तांची भर पडत असून, लोकसंख्याही झपाट्याने वाढत आहे.

हेही वाचा – आरटीई प्रवेशांसाठी मुदतवाढ… कधीपर्यंत घेता येणार प्रवेश ?

औद्योगिक परिसरालगतच हिंजवडी, तळवडे माहिती व तंत्रज्ञाननगरी (आयटी पार्क), चाकण, रांजणगाव एमआयडीसी हा भाग येतो. संपूर्ण देशभरातून नागरिक या परिसरात रोजगारानिमित्त येतात. मात्र, अंतर्गत रस्ते, पाणी, वीज अशा मूलभूत सुविधांचा काही प्रमाणात अभाव आहे. त्यामुळे येथील कामगार वर्ग पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास प्राधान्य देतो. याचाच परिणाम आयटी पार्क आणि एमआयडीसीलगतच्या महापालिका हद्दीत बांधकामांचे प्रमाण वाढले. गुंठा, अर्धा गुंठा जागा घेऊन बांधकामासह मोठे गृहप्रकल्प उभे राहत आहेत.

‘आय टू आर’ म्हणजे काय?

अनेक कंपन्यांनी स्थलांतर केले, तर काही कंपन्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे काही कंपन्यांसह विकसकांनी भूखंड वापर बदलाचे प्रस्ताव महापालिकेकडे पाठवले होते. औद्योगिक (इंडस्ट्रिअल) भूखंडाचा वापर निवासी (रेसिडेन्शिअल) करण्याच्या प्रक्रियेला ‘आय टू आर’ म्हणतात. या जागांवर निवासी गृहप्रकल्प व वाणिज्य वापरासाठी प्रकल्प उभारले आहेत. काही जागा महापालिकेने ताब्यात घेऊन जलकुंभ, उद्यान, क्षेत्रीय कार्यालय, दिव्यांग भवन, पोलीस ठाणे, जलतरण तलाव अशा सुविधा विकसित केल्या आहेत, तर काही जागांवर आरक्षणे प्रस्तावित असून, अनेक जागा मोकळ्या आहेत.

हेही वाचा – पुढील तीन दिवस पावसाचे; किनारपट्टी, घाटमाथा, विदर्भात जोर

नवीन उद्योगांसाठी जागा मिळत नसताना औद्योगिक प्रयोजनासाठीच्या भूखंडांचे निवासीकरणात रुपांतर करणे चुकीचे आहे. शहरातील उद्योग बाहेर जात आहेत. त्याचा उद्योगनगरीला फटका बसत आहे. – संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटना

महापालिकेकडे २००७ पासून औद्योगिक भूखंडाचे निवासी, वाणिज्य वापरात बदल करावेत, असे १२६ प्रस्ताव आले. या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. – मकरंद निकम, शहर अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका