राहुल खळदकर
दुष्काळामुळे यंदा आवळा उत्पादनावर मोठा परिणाम झाला असून उत्पादन ७० टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे या बहुगुणी फळाची किंमत बाजारात प्रचंड वाढणार आहे.
आवळय़ाचा हंगाम सुरू झाला असून, पुण्यातील घाऊक फळ बाजारात आवळय़ाला प्रतिकिलो २५ ते ४० रुपये भाव मिळत आहे. किरकोळ बाजारात प्रतिकिलो आवळय़ाची विक्री ६० ते ८० रुपये किलो दराने केली जात आहे. मात्र, यंदा राज्यात दुष्काळी वातावरण असल्याने आवळय़ाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.
निलंगे म्हणाले, आवळय़ाचा हंगाम साधारणपणे नोव्हेंबर महिन्यात सुरू होतो. फेब्रुवारी महिन्यापर्यंत हंगाम सुरू राहतो. आवळय़ाच्या चकाया, नरेंद्र-७, कृष्णा, कांचन या जाती आहेत. राज्यात मालेगाव भागात आवळय़ाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर घेतले जाते. मार्केट यार्डातील फळ बाजारात राजस्थानातून आणि मालेगाव भागातून आवळय़ाची आवक होते. हंगामात राजस्थानातून चकाया जातीच्या आवळय़ाची दिवसाआड सुमारे १० टन आवक होते. बार्शी तसेच नगर जिल्हय़ातही आवळय़ाचे उत्पादन घेतले जाते. नरेंद्र-७ जातीच्या आवळय़ांची दररोज ४ ते ५ टन आवक येथील बाजारात होते. नरेंद्र-७ जातीच्या वाणाचा रंग हिरवा असतो. चमकदार आणि गोलाकार हे नरेंद्र-७ जातीच्या आवळय़ांचे वैशिष्टय़ आहे. या वाणाला अन्य जातीच्या आवळय़ांपेक्षा प्रतिकिलो ५ ते ७ रुपये जादा भाव मिळतो.
झाले काय?
आवळय़ाची आवक आणि उत्पादनाचा राज्याचा विचार करता आवळय़ाचे उत्पादन जवळपास ७० टक्क्यांनी कमी झाले असल्याची माहिती पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील प्रमुख आवळा व्यापारी विलास निलंगे यांनी दिली. इतक्या मोठय़ा प्रमाणावर उत्पादन घटल्याने येत्या काही दिवसांत त्याची आवक घटेल आणि किंमतीवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची चिन्हे आहेत.
पुण्यात आठवडय़ाला ३० ते ४० हजार किलो आवळय़ाची विक्री
पुणे शहरात आवळय़ाची मोठय़ा प्रमाणात विक्री होते. आठवडय़ात ३० ते ४० टन आवळय़ाची खरेदी मार्केट यार्डातील बाजार आवारातून केली जाते. शहरात व्यवसाय करणारे किरकोळ विक्रेते आणि पिंपरी, निगडी, लोणावळा, हडपसर भागातील किरकोळ विक्रेत्यांकडून आवळय़ाला मागणी असते. सर्वाधिक मागणी चकाया आणि नरेंद्र-७ या जातीच्या आवळय़ांना असते. प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांकडून नरेंद्र-७ या जातीचे आवळे खरेदी करण्यास प्राधान्य दिले जाते.
बेळगाव, कोल्हापूर, हुबळीत आवक
आवळय़ात असलेल्या आयुर्वेदिक गुणधर्मामुळे सामान्य ग्राहकांकडून मागणी वाढत आहे तसेच प्रक्रिया उद्योग आणि वैद्यांकडून आवळय़ाची मोठय़ा प्रमाणावर खरेदी केली जाते. आवळय़ापासून आवळा कँडी, च्यवनप्राश तसेच आवळय़ाचा रस तयार केला जातो. पुण्यातील घाऊक बाजारातून बेळगाव, हुबळी आणि कोल्हापुरात आवळा मोठय़ा प्रमाणावर विक्रीस पाठविला जातो, असे आवळय़ाचे व्यापारी विलास निलंगे यांनी सांगितले.