पुणे : पुण्यात गृहनिर्माण क्षेत्रात मागील काही वर्षांत वाढ होताना दिसत आहे. मात्र, मागील वर्षभरात शहरात घरांच्या किमती ११ टक्क्याने वाढल्या आहेत. याचवेळी घरांच्या विक्रीत ७.९६ टक्के घट नोंदविण्यात आली आहे.
गेरा डेव्हलपमेंट्सने पुण्यातील निवासी मालमत्ता क्षेत्राचा जानेवारी ते जून दरम्यानचा सहामाही अहवाल जाहीर केला आहे. पुण्याच्या ३० किलोमीटर परिघात असलेल्या सर्व बांधकाम प्रकल्पांची पाहणी करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यात पुण्यातील निवासी मालमत्ता क्षेत्रातील १५१ सूक्ष्मबाजारपेठांचा समावेश आहे. मागील काळात घरांच्या विक्रीत सातत्याने वाढ झालेली असताना यंदा पहिल्या सहामाहीत घरांच्या विक्रीत घट झाल्याचे निरीक्षण अहवालात नोंदविण्यात आले आहे.
या अहवालानुसार, मागील १२ महिन्यांत घरांच्या किमतीत सुमारे ११ टक्के वाढ झाली आहे. नवीन गृहप्रकल्पांच्या संख्येत आणि घरांच्या विक्रीत घट झालेली आहे. पहिल्या सहामाहीचा विचार करता ४१ हजार १७८ घरांची विक्री झाली. मागील वर्षी पहिल्या सहामाहीत ५३ हजार ३९८ घरांची विक्री झाली होती. मागील वर्षीच्या तुलनेत विक्रीत यंदा १२ टक्के घट झाली आहे. घरांच्या किमती मागील वर्षी जुलैअखेरीस प्रतिचौरस फूट ५ हजार २०८ रुपये होत्या. त्या यंदा जूनअखेरपर्यंत ५ हजार ७८२ रुपयांवर पोहोचल्या. त्यात ११ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.
हेही वाचा – मंत्रिपदासाठी भेटीगाठी… पुणे, पिंपरी-चिंचवडमधील ‘हे’ इच्छुक
मागील वर्षभरात पुण्यात घरांच्या किमती १२ टक्के वाढल्या आहेत. घरांच्या वाढलेल्या किमती आणि जादा व्याजदर यामुळे घरांच्या विक्रीत घट झाली आहे. आगामी काळात गृहनिर्माण क्षेत्राची वाढ कायम राहण्याची चिन्हे आहेत. – रोहित गेरा, व्यवस्थापकीय संचालक, गेरा डेव्हलपमेंट्स