पुणे : राज्य मंडळातर्फे दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा मंगळवारपासून (१६ जुलै) सुरू होत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या नोंदणीमध्ये मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे.
राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावीची पुरवणी परीक्षा १६ जुलै ते ३० जुलै या कालावधीत, तर बारावीची परीक्षा १६ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत घेतली जाणार आहे. परीक्षेसाठी राज्य मंडळामार्फत प्रसिद्ध आणि छपाई केलेले वेळापत्रकच ग्राह्य धरावे, अन्य संकेतस्थळांवरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये. सकाळ सत्रात साडेदहा वाजता, दुपार सत्रात अडीच वाजता विद्यार्थ्याने परीक्षा दालनात उपस्थित राहणे आवश्यक आहे. सकाळ सत्रात अकरा वाजता, दुपार सत्रात तीन वाजता प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल.
हेही वाचा…‘संविधान हत्या दिवसा’च्या विरोधात; थेट सरन्यायाधीशांना पत्र… काय आहेत मागण्या?
फेब्रुवारी-मार्च २०२४च्या परीक्षेप्रमाणेच परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वाढवून देण्यात आली आहे. तसेच पुरवणी परीक्षेतही प्रात्यक्षिक, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन, श्रेणी परीक्षांचे गुण ऑनलाइन भरून घेतले जाणार आहेत, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.
यंदा दहावीसाठी २८ हजार ९७६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यात २० हजार ३७० मुले, ६ हजार ६०५ मुली, एक तृतीयपंथी विद्यार्थ्याचा समावेश आहे. तर बारावीसाठी ५६ हजार ८४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यात ३६ हजार ५९० मुले, २० हजार २५० मुली, पाच तृतीयपंथी विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती राज्य मंडळाने दिली. गेल्यावर्षी दहावीसाठी ४९ हजार ४६८, बारावीच्या ७० हजार ४६२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेच्या विद्यार्थी नोंदणीत घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.