महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा केला जात आहे. गणपती उत्सवात आपल्याला वेगवेगळे देखावे बघायला मिळतात. देशाची मान अभिमानाने उंच केलेली मोहीम म्हणजे चांद्रयान मोहीम होय. असाच एक भव्य देखावा पिंपरी-चिंचवडमध्ये बघण्यास मिळत असून, चांद्रयानची तब्बल २५ ते ३० फूट प्रतिकृती देखावा म्हणून बनवण्यात आली आहे. त्यामुळे हा देखावा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
चांद्रयान तीन मोहीम इसरोने यशस्वीरित्या पार पाडली आणि अवघ्या जगभरात भारताचं कौतुक झालं. आता हेच चांद्रयान गणेशोत्सवात देखावा म्हणून घराघरात बघायला मिळत आहे. घरगुती गणपतीपासून ते मंडळाचे गणपती चांद्रयानचा देखावा सादर करत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरीमधील इन्फिनिटी इंजिनिअररिंग सोल्युशन्स कंपनीत चांद्रयानची हुबेहूब प्रतिकृती देखावा म्हणून गणपती बाप्पाच्या चरणी सादर केली आहे. तब्बल २५ ते ३० फूट उंच असलेली ही प्रतिकृती गणेश भक्तांचं लक्ष वेधून घेत आहे. याच कंपनीने चांद्रयान तीनसाठी खारीचा वाटा उचलत फिक्चर पार्ट चांद्रयानसाठी बनवले होते, अशी माहिती कंपनीचे मालक अनंत हेंद्रे यांनी दिली.
चंद्रयान मोहीम यशस्वीरित्या पार पडल्याने आम्हालादेखील गणपती देखावा म्हणून चांद्रयान मोहीम सादर करायची होती, त्यासाठी आम्ही थर्माकॉलचा वापर करत १५ जणांच्या पथकाने चांद्रयानचा देखावा गणपती बाप्पापुढे सादर केला आहे. चांद्रयान बनवण्यासाठी १५ जणांच्या टीमला सहा दिवस लागल्याचं अनंत हेंद्रे यांनी सांगितले.