पुणे : गेले काही दिवस सातत्याने तेजीत असलेल्या मासळीच्या दरात घट झाली आहे. त्यामुळे मासेप्रेमी खवय्यांना दिलासा मिळाला आहे. बाजारात आवक वाढल्याने मासळीचे दर २० ते ३० टक्क्यांनी कमी झाले आहेत.
पावसाळा सुरू झाल्याने खोल समुद्रातील मासेमारी बंद झाली आहे. समुद्रातील मासेमारी बंद झाल्याने बाजारपेठेत मासळीची आवक कमी होऊन दरवाढ झाली होती. मात्र गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी खोल समुद्रातील मासळीची आवक वाढली. खोल समुद्रातील मासळीची १० ते १२ टन, नदीतील मासळी ५०० ते ७०० किलो, तसेच आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सिलनची एकूण मिळून १५ ते २० टन आवक झाली, अशी माहिती मासळीविक्रेते ठाकूर परदेशी यांनी दिली. इंग्लिश अंड्याच्या दरात शेकड्यामागे ३० रुपयांनी वाढ झाली. दरम्यान, चिकन, मटणाचे दर स्थिर असल्याचे चिकनविक्रेते रुपेश परदेशी आणि मटणविक्रेते प्रभाकर कांबळे यांनी सांगितले.