दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि चैतन्याचा काळ. कुटुंबातील प्रियजनांच्या भेटीगाठी, फराळ आणि खाद्यपदार्थांची रेलचेल यांच्या बरोबरीने खरेदीचा उत्साहही या काळात प्रामुख्याने दिसून येतो. दोन वर्षांनंतर यंदा दिवाळीचा उत्साह बाजारपेठेत दिसत असतानाच गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅममागे झालेली दीड हजार रुपयांची घसघशीत घटही ग्राहकांच्या विशेष पथ्यावर पडत असल्याचे चित्र आहे.
हेही वाचा : विश्लेषण : टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान धोकादायक संघ… पण जगज्जेतेपदाची संधी किती?
धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन आणि दिवाळी पाडवा यानिमित्ताने आवर्जून सोने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. यंदा दिवाळीच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या दरात घट दिसू लागली. त्याचा सकारात्मक परिणाम शनिवारी धनत्रयोदशीच्या निमित्ताने सोने खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांच्या संख्येवर दिसून आला. विशेष म्हणजे एरवी गॅजेट्स, उंची कपडे, वाहने अशा खरेदीला प्राधान्य देणारे तरुण ग्राहकही आता आवर्जून सोने खरेदी करत असल्याचे निरीक्षण सराफ व्यावसायिकांकडून नोंदवण्यात येत आहे. एक टक्के मूल्यवर्धित कराच्या कक्षेतून सोने आता तीन टक्के वस्तू आणि सेवा कराच्या कक्षेत आल्याने चोख सोने घेण्यापेक्षा तयार दागिने घेण्याला ग्राहक पसंती देत आहेत.
पु. ना. गाडगीळ ॲण्ड सन्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक अमित मोडक म्हणाले, मागील दोन महिन्यांच्या तुलनेत धनत्रयोदशीला प्रति दहा ग्रॅम सोन्यामागे दीड हजार रुपये एवढी घट दिसून आली आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये उत्साह आहे. तरुण ग्राहक तयार दागिन्यांना पसंती देत आहेत. चोख सोन्याला तीन टक्के आणि तयार दागिन्याला तीन टक्के असा सहा टक्के वस्तू आणि सेवा कर देण्यापेक्षा एकदाच तयार दागिना घेणे ग्राहक पसंत करत आहेत. तरुणाई १४ ते १८ कॅरेट दागिने, हिरे, रोझगोल्ड खरेदीला प्राधान्य देत आहे, तर इतर ग्राहक २२ कॅरेटमधील हार, बांगड्या, गोठ अशी खरेदी करत आहेत, असे निरीक्षण मोडक यांनी नोंदवले.
कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्सचे भागीदार अतुल अष्टेकर म्हणाले की, दोन वर्षांच्या खंडानंतर धनत्रयोदशी आणि मुहूर्तावर सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहक बाहेर पडत आहेत. त्यामुळे बाजारात उत्साह आहे. तशातच गेल्या पाच ते सहा दिवसांमध्ये सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम दीड हजार रुपयांपर्यंत घट झाली आहे. त्याचा सकारात्मक परिणामही ग्राहक संख्येवर दिसून येत आहे. करोनापूर्वी मुहूर्तावरील सोने खरेदी ही ४५-५० वर्ष वयोगटातील ग्राहकांची पसंती होती. आता मात्र, तरुणाईलाही सोन्यात पैसे गुंतवण्याचे महत्त्व कळले आहे, असे निरीक्षण आहे. मोठ्या संख्येने चाळीशीच्या आतील व्यक्तीही आता तयार दागिने, सोन्याची वळी किंवा पान, नाणे विकत घेणे पसंत करत आहेत.
हेही वाचा : पुणे: दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या; रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी
रांका ज्वेलर्सचे संचालक शैलेश रांका म्हणाले की, सोन्याच्या दरातील घट ग्राहक आणि विक्रेते या दोन्हींसाठी अत्यंत उत्साहवर्धक आहे. विशेषत: मागील दोन वर्षे करोनामध्ये काहीशी ठप्प झालेली मुहूर्ताची खरेदी यंदा पुन्हा होताना दिसत आहे. अगदी पंचविशीतील ग्राहकही आता सोनेखरेदीकडे वळताना दिसत आहेत. तयार दागिने, चोख सोने घेण्याकडे ग्राहकांचा कल आहे.