Deenanath Mangeshkar Hospital: पुण्यात तनिषा भिसे या महिलेचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबियांनी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनावर गंभीर आरोप केले होते. गर्भवती असेलल्या तनिषा भिसे यांच्या उपचारांसाठी कुटुंबियांकडून १० लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. पण पैशाअभावी वेळेत उपचार न दिल्याने तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे.

दरम्यान पुण्यात घडलेल्या या प्रकरणाची सध्या राज्यभरात चर्चा होत असून, अनेकांनी या घटनेनंतर रुग्णालयावर टीका केली होती. यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चार सदस्स्यांची चौकशी समिती स्थापन केली होती. आता या चौकशी समितीचा अहवाल समोर आला आहे.

मूल दत्तक घेण्याचा सल्ला

या अहवालामध्ये तनिषा भिसे २०२० पासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत होत्या असे म्हटले आहे. याचबरोबर भिसे यांच्यावर २०२२ साली एक शस्त्रक्रियाही झाली असून त्यामध्ये त्यांना खर्चाच्या ५० टक्के रकमेची सूट देण्यात आल्याचेही अहवालात म्हटले आहे. दरम्यान या चौकशी समितीच्या अहवालात असेही म्हटले आहे की, या पीडित महिलेची सुखरूप प्रसुती होण्याची शक्यता नसल्याने रुग्णालयाने त्यांना मूल दत्तक घेण्याचा सल्ला दिला होता.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या चौकशी समितीच्या अहवालात दावा करण्यात आला आहे की, पीडित महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी दर सात दिवसांनी यायला सांगितले होते. पण पीडित महिला तपासणीसाठी येत नव्हती.

पीडित महिलेने तपासणी केली नाही

रुग्णालयाच्या अहवालात म्हटेले आहे की, “सर्व रुग्णालयामध्ये असा संकेत असतो की, आई व बाळाच्या सुरक्षिततेसाठी प्रसूतीपूर्व तपासणी कमीत कमी ३ वेळा करून घेणे आवश्यक असते. पण पीडित महिलेने ही तपासणी केली नाही. १५ मार्च रोजी पीडित महिला इंदिरा आयव्हीएफचे रिपोर्ट घेऊन डॉक्टर घैसास यांना भेटली होती. अतिशय जोखमीच्या व धोकादायक गर्भधारणेबाबत डॉक्टर घैसास यांनी त्यांना माहिती दिली. तसेच त्यांना दर ७ दिवसांनी तपासणीस बोलावले. त्याप्रमाणे त्यांनी २२ तारखेस येणे अपेक्षित होते. परंतु त्या तपासणीसाठी आल्या नाहीत.”

चौकशी यंत्रणांना आम्ही…

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या चौकशी समितीचा अहवाल येण्यापूर्वी रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर यांनी माध्यमांशी बोलताना, “सदर प्रकरणात जी माहिती समोर आली आहे, ती दीशाभूल करणारी आहे. चौकशी यंत्रणांना आम्ही सर्व ती माहिती देणार आहोत”, असे सांगितले होते.