पुणे: भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिशा भिसे यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासना कडून उपचारासाठी पैशांची अडवणूक केल्याने गर्भवती तनिशा यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आला आहे.या घटनेची माहिती माध्यमातून समोर आल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाबाबत संतप्त प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी राज्य सरकारमार्फत समिती देखील नेमण्यात आली आहे.

मागील दोन दिवसांपासून रुग्णालयाबाहेर विविध संघटनामार्फत आंदोलन करीत निषेध नोंदविला जात आहे.तर आज शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालय प्रशासनावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करीत यावेळी चिल्लर फेकून निषेध नोंदविला.तसेच काल पतितपावन संघटनेकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या फलकाला काळे फासून निषेध नोंदविला होता. त्यामुळे आज रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी नावाचा फलक काढून टाकला.

यावेळी प्रशांत जगताप म्हणाले, राज्य सरकारकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालय ट्रस्ट ने जमीन घेतेवेळी रुग्णांना अगदी माफक दरात उपचार केले जातील,असे सांगितले.पण ट्रस्ट ने राज्य सरकार चे नियम पाळले नाहीत.तर प्रत्येक रुग्णांकडुन लाखो रुपये उकळले जातात हे आजवर समोर आले आहे.आम्ही त्या विरोधात वेळोवेळी आवाज उठवला आहे.पण दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कोणत्याही प्रकाराची कारवाई झाली नाही.त्याच दरम्यान पुन्हा एकदा रुग्णांची पैशांची अडवणूक केल्याची घटना समोर आली असून त्यामध्ये एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे.त्यामध्ये जबाबदार असणार्‍या डॉक्टरांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी आणि राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन न केल्याने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची जमीन राज्य सरकारने ताब्यात घ्यावी,अशी मागणी यावेळी त्यांनी केली.