पुणे : ‘ईश्वरी भिसे यांच्या प्रकरणात नातेवाइकांकडून दिशाभूल करणारे आरोप केले जात आहेत,’ असा अहवाल दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील तज्ज्ञ समितीने शुक्रवारी जाहीर केला. याप्रकरणी चौकशीसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तज्ज्ञांची समिती स्थापन केली होती. त्यात वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनुजा जोशी, अतिदक्षता विभागप्रमुख डॉ. समीर जोग आणि प्रशासक सचिन व्यवहारे यांचा समावेश होता. या समितीने रुग्णाचे जुने आणि आताचे वैद्यकीय अहवाल आणि रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे जबाब नोंदवून घेतले.

‘ईश्वरी भिसे २०२० पासून रुग्णालयात वेळोवेळी उपचार व सल्ला घेण्यासाठी येत होत्या. त्यांची २०२२ मध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये ५० टक्के सवलतीचा लाभ घेऊन शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर २०२३ मध्ये या रुग्णाला सुखरूप गर्भारपण व प्रसूती होण्याची शक्यता नसल्याने मूल दत्तक घेण्याविषयीचा सल्ला रुग्णालयाकडून देण्यात आला होता. आई व बाळाच्या सुरक्षिततेसाठी प्रसूतिपूर्व तपासणी किमान ३ वेळा करवून घेणे आवश्यक असते. ती त्यांनी या रुग्णालयात केली नाही वा त्याची माहिती रुग्णालयास दिली नाही. नंतर इंदिरा आयव्हीएफचे तपासणी अहवाल घेऊन रुग्ण १५ मार्चला डॉ. सुश्रुत घैसास यांना भेटल्या. अतिशय जोखमीच्या व धोकादायक प्रसूतीबद्दल डॉ. घैसास यांनी त्यांना कल्पना दिली. तसेच दर ७ दिवसांनी तपासणीस बोलावले. त्याप्रमाणे त्यांनी २२ तारखेस येणे अपेक्षित होते. परंतु त्या आल्या नाहीत,’ असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

अहवालात पुढे म्हटले आहे, ‘पती व नातेवाइकांसह रुग्ण २८ मार्चला सकाळी ११.३० वाजता घैसास यांच्या बाह्य रुग्ण विभागात आल्या. त्या आपत्कालीन विभागात आल्या नव्हत्या. डॉ. घैसास यांनी रुग्णाची तपासणी केली. त्यांची प्रकृती स्थिर होती आणि कोणत्याही तातडीच्या उपचारांची गरज नव्हती. परंतु जोखमीची अवस्था लक्षात घेता रुग्णाला भरती होण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर प्रसूती आणि सिझेरिअन शस्त्रक्रियेतील धोक्याची माहिती देण्यात आली. तसेच, नवजात अर्भक कक्षाच्या डॉक्टरांशी त्यांची भेट करून देण्यात आली. कमी वजनाची, ७ महिन्यांची जुळी मुले, जुन्या आजाराची गुंतागुंत व कमीत कमी दोन ते अडीच महिने नवजात बालकांवर अतिदक्षता विभागात उपचार करावे लागतील हे समजावून सांगण्यात आले आणि त्यासाठी एकंदरीत १० ते २० लाख रुपये खर्च येऊ शकतो, याची कल्पना देण्यात आली. त्यावर रुग्णाच्या नातेवाइकांनी तुम्ही भरती करून घ्या, आम्ही प्रयत्न करतो, असे सांगितले. रुग्णाच्या नातेवाइकांनी वैद्यकीय संचालक डॉ. केळकर यांना दूरध्वनी करून पैशांची अडचण सांगितली. त्यावर डॉ. केळकरांनी जमतील तेवढे पैसे भरा (नातेवाइकांच्या म्हणण्यानुसार, २ ते २.५ लाख रुपये) म्हणजे मी डॉ. घैसास यांना सांगतो, असे सांगितले. असाच सल्ला एका दूरच्या नातेवाइकांना सचिन व्यवहारे यांनी दूरध्वनीवरून दिला. रुग्णाचा कोणीही नातेवाइक प्रशासन अथवा धर्मादाय विभागात प्रत्यक्ष भेटला नाही.’

‘डॉ. केळकर यांनी डॉ. घैसास यांना दूरध्वनी करून याबाबत चौकशी केली असता, त्यांनी रुग्ण न सांगता निघून गेल्याचे सांगितले. पैशांची तजवीज न झाल्यास रुग्णाच्या पतीला ससून येथे जाण्याचा सल्ला डॉ. घैसास यांनी दिला होता. रुग्णाच्या नातेवाइकांकडून काहीच हालचाल न झाल्याने डॉ. घैसास यांनी रुग्णाच्या पतीला दूरध्वनी केला; परंतु तो त्यांनी उचलला नाही. २८ मार्चच्या दुपारनंतर रुग्णाचे काय झाले याबद्दल डॉ. घैसास व रुग्णालय प्रशासन यांना काहीच कल्पना नव्हती,’ असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

‘रुग्णाला २८ मार्चला सायंकाळी ५.३० वाजता सूर्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आणि २९ मार्चला सकाळी सिझेरिअन झाले. ‘दीनानाथ’मधून रुग्ण ससून आणि तेथून सूर्या हॉस्पिटलमध्ये स्वतःच्या वाहनाने गेला आणि सिझेरिअनही दुसऱ्या दिवशी झाले. तसेच सूर्या हॉस्पिटलमधील माहितीनुसार, आधीच्या शस्त्रक्रियेची व कर्करोगासंबंधीची माहिती नातेवाइकांनी लपवून ठेवली असे समजते,’ असा दावाही समितीने केला आहे.