पिंपरी : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून उपचारात हलगर्जीपणा झाल्याने गर्भवतीचा मृत्यू झाल्याचा ठपका आरोग्य विभागाच्या समितीच्या पहिल्या अहवालात ठेवण्यात आला आहे. डॉ. सुश्रुत घैसास आणि त्यांच्या चमूने पाच तास रुग्णाला थांबवून ठेवले. कोणतेही उपचार केले नाहीत. त्यामुळे डॉ. घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करावा. त्यांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रावर टाच आणावी, अशी मागणी भाजप आमदार अमित गोरखे यांनी केली आहे.

तनिषा भिसे या धर्मादाय योजनेअंतर्गत पात्र असतानाही त्यांना रुग्णालयात दाखल करून घेतले नाही. दहा लाख रुपयांची अनामत रक्कम मागितल्याचा ठपका रुग्णालयावर अहवालात ठेवण्यात आला आहे. तर, रुग्णाला पाच तास उपचार केले नसल्याचा दावा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केला आहे. भिसे यांच्या मृत्यूस रुग्णालय जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

याबाबत माध्यमांशी चिंचवड येथे बोलताना आमदार गोरखे म्हणाले, ‘डॉ.घैसास यांनी पाच तास रुग्णाला थांबवून ठेवले. कोणतेही उपचार केले नाहीत. त्यामुळे प्राथमिक अहवालात डॉ.घैसास आणि त्याचा चमू दोषी असल्याचे स्पष्ट होत आहे. रुग्णाचा वैद्यकीय इतिहासाही दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने प्रसिद्ध केला आहे. हे चुकीचे असून अहवालात त्याबाबतही ठपका ठेवला आहे. मंगेशकर कुटुंबाने ज्या उद्गात हेतूने रुग्णालय सुरू केले आहे. तो हेतू अनेकवेळा साध्य केला आहे. अनेक गरिबांना न्याय मिळाला आहे. उपचार मिळाले आहेत. मात्र, डॉ.घैसास आणि त्यांच्या चमूमुळे काळा डाग लागला आहे’.

‘या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ दखल घेतली. समिती नेमली. दोन्ही बाळांच्या रुग्णालयातील उपचाराच्या खर्चाची जबाबदारीही फडणवीस यांनी स्वीकारली आहे. बाळांचे संगोपन करण्यास आम्ही समर्थ आहोत. परंतु, माणुसकी म्हणून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने वयाची १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत दोन्ही मुलींच्या संगोपणाची जबाबदारी घ्यावी. धर्मादाय आयुक्त आणि माता मृत्यूचा यमुना जाधव यांचा हे दोन अहवाल लवकरच येतील. तिन्ही अहवाल एकत्रित करून मुख्यमंत्र्यांना सादर केले जातील. त्यानंतर डॉ.घैसास यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आमचा रुग्णालय प्रशासनावर रोष नसून डॉ. घैसास यांच्यावर आहे. त्यांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रावरही टाच आणली पाहिजे’, अशी मागणी आमदार गोरखे यांनी केली.