पिंपरी-चिंचवडच्या वैभवात भर पडेल आणि परिसरातील नागरिकांच्या दृष्टीने करमणुकीचे मुख्य केंद्र तयार होईल, या हेतूने १७ वर्षांपूर्वी तळवडे येथे ‘डीयर पार्क’ उभारण्याची घोषणा पालिकेने केली. प्रत्यक्षात, इच्छाशक्तीचा अभाव, शासकीय संस्थांमध्येच नसलेला समन्वय, अधिकाऱ्यांचा वेळकाढूपणा यांसारख्या कारणांमुळे हा प्रकल्प कागदावरच राहिला होता. तथापि, आता या प्रकल्पाला चालना मिळाली असून त्यासाठी स्थानिक नेत्यांसह राज्य शासनातील सचिव व महापालिकेचे माजी आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगण्यात येते.
हरीण उद्यानासाठी आरक्षण नव्हते, ही मुख्य अडचण १९९७ पासून होती, त्यामुळे काहीच करता येत नव्हते. अजित पवार, विलास लांडे, महेश लांडगे, शांताराम भालेकर आदींनी वेगवेगळ्या माध्यमातून अनेक वर्षे पाठपुरावा केला. मात्र, आतापर्यंत यश येत नव्हते. राज्य शासनाने विकास आराखडय़ातील तळवडे येथील राखीव भाग मंजूर करण्याचे आदेश दिले तसेच काही तांत्रिक अडथळे दूर झाल्याने आता ५५ एकरात हरीण उद्यानाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून तो शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. सध्या राज्य शासनाच्या ताब्यात असलेली या प्रकल्पाची जागा कायमस्वरूपी िपपरी पालिकेला देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात येणार आहे व त्याचा योग्य मोबदला देण्याची महापालिकेची तयारी असल्याचे अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांनी म्हटले आहे. या प्रक्रियेला वर्षभराचा कालावधी लागू शकेल, त्यानंतर प्रत्यक्षात कार्यवाही सुरू होईल. दरम्यान, या जागेचे क्षेत्र विकसित करण्यासाठी पालिकेने वास्तुविशारद नियुक्त केले आहे.
नियोजित हरीण उद्यानातील पहिल्या टप्प्यात सांबर, भेकर, चिंकारा, काळवीट या जातींची हरणे असतील व नागरिकांना मुक्त अवस्थेत ती पाहता येतील, असे नियोजन होते. १९९७ मध्ये तळवडय़ाचा िपपरी पालिकेत समावेश झाला. तेव्हा प्रविणसिंह परदेशी आयुक्त होते. गायरानाच्या जागेत हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. पुढे शासकीय पातळीवर बऱ्याच घडामोडी होत गेल्या. परदेशी मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून मंत्रालयात आले आणि हरीण उद्यानाचा विषय मार्गी लावण्यात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले.
तळवडय़ातील हरीण उद्यानाला १७ वर्षांच्या पाठपुराव्यानंतर चालना
पिंपरी-चिंचवडच्या वैभवात भर पडेल आणि परिसरातील नागरिकांच्या दृष्टीने करमणुकीचे मुख्य केंद्र तयार होईल, या हेतूने १७ वर्षांपूर्वी तळवडे येथे ‘डीयर पार्क’ उभारण्याची घोषणा पालिकेने केली.
First published on: 26-06-2015 at 03:10 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deer park pimpri chinchwad