पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे यांना शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अब्रनुकसानाची नोटीस बजाविली आहे. या नोटीशीला चार दिवसांत उत्तर देण्यात यावे, असे नमूद करण्यात आले असून, उत्तर न मिळाल्यास न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

नवी दिल्ली येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील एका मुलाखती दरम्यान डाॅ. गोऱ्हे यांनी वादग्रस्त विधान केले होते. ‘दोन अलिशान मोटारी दिल्याशिवाय शिवसेना (ठाकरे) पक्षात कोणतेही पद मिळत नव्हते,’ असे गोऱ्हे यांनी म्हटले होते. त्याचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकारणात उमटले असून शिवसेना (ठाकरे) पक्षाने गोऱ्हे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानुसार उपनेत्या अंधारे यांनी ॲड. असीम सरोदे यांच्या मार्फत गोऱ्हे यांना अब्रुनुकसानीची नोटीस बजाविली आहे.

‘साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा गैरवापर करून शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची बदनामी करण्यात आली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर राजकीय नेते करत आहेत. बेताल, असभ्य विधाने करण्याच्या अविर्भावात नेते असतात. सभ्यतेच्या मर्यादांची जाणीव आणि वैचारिक पात्रता असलेली व्यक्ती व्यासपीठाचा दुरूपयोग करत नाहीत. त्यामुळे डाॅ. गोऱ्हे यांनी यासंदर्भात जाहीर माफी मागावी आणि पुन्हा अशी बेताल, असभ्य विधाने करणार नाही, याची हमी चार दिवसांत द्यावी. नोटीशीला चार दिवसांत उत्तर न आल्यास न्यायालयात दाद मागण्यात येईल,’ असे या नोटीशीत नमूद करण्यात आल्याची महिती ॲड. असीम सरोदे यांनी दिली.

नाना भानगिरे यांंचा आरोप

शिवसेना (ठाकरे) पक्षाचे खासदार, प्रवक्ते संजय राऊत यांनी डाॅ. नीलम गोऱ्हे यांच्यासंदर्भात बेताल विधान करून अपमान केल्याचा निषेधार्थ शिवसेना (शिंदे) पक्षाकडून मंगळवारी आंदोलन करण्यात आले. शहर प्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

‘शिवसेना (ठाकरे) पक्षात असे काम चालते, त्याची भूमिका गोऱ्हे यांनी मांडली. तोच अनुभव महापालिकेचा नगरसेवक असताना आला. स्थायी समिती सदस्य होण्यासाठी तत्कालीन संपर्क प्रमुखांनी माझ्याकडे २५ लाखांची मागणी केली होती. त्यापैकी पाच लाख रुपये दिल्याचे माझ्याकडे पुरावे आहेत,’ असा आरोप भानगिरे यांनी केला.

Story img Loader