पुणे : ‘महा-राष्ट्रवादी चर्चा’ या नावाने फेक फेसबुक पेज तयार करून त्यावर अश्लील व्हिडीओ आणि छायाचित्रे टाकण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हे पेज व्हिएतनाम येथील चार आणि इंडोनेशिया येथील दोन व्यक्तींकडून चालविले जात असून, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी शहर सायबर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक मीनल पाटील यांना निवेदन देऊन हे पेज काढून टाकण्याची मागणी केली आहे. यावेळी विनोद पवार, राजू चव्हाण, अनुज कांबळे, कामरान अरब हे पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा – पुणे : वानवडीत सोसायटीमध्ये जाऊन टोळक्याची दहशत; रहिवाशांना जीवे मारण्याची धमकी
याबाबत प्रदीप देशमुख म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि नेत्यांचे नाव बदनाम करण्यासाठी ‘महा राष्ट्रवादी चर्चा’ या नावाने फेसबुक पेज तयार करण्यात आले आहे. त्यावर अश्लील व्हिडीओ आणि छायाचित्रे टाकण्यात आली आहेत. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
हेही वाचा – रेल्वे प्रवाशांसाठी खूषखबर! उत्तर भारतात जाण्यासाठी साप्ताहिक सुपरफास्ट गाड्या
या पेजबाबात माहिती घेतली असता, हे पेज व्हिएतनाम येथील चार व इंडोनेशिया येथील दोन व्यक्तींकडून चालविले जात असल्याचे निदर्शनास आले आहे, असेही देशमुख म्हणाले.